जिल्ह्यातील ६९ हातपंप नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:06+5:302021-03-18T04:29:06+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील हातपंप नादुरुस्त असल्याची ओरड होत असली, तरीही जिल्हा परिषद प्रशासनाकडे मात्र ६९ हातपंप नादुरुस्त ...

जिल्ह्यातील ६९ हातपंप नादुरुस्त
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील हातपंप नादुरुस्त असल्याची ओरड होत असली, तरीही जिल्हा परिषद प्रशासनाकडे मात्र ६९ हातपंप नादुरुस्त असल्याची माहिती आहे. तर ४०३ हातपंप कायमस्वरुपी बंद असल्याचे सांगण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील चालू हातपंपांची संख्या हिंगोली ९०८, वसमत १,२१०, औंढा ८०७, कळमनुरी १,१७०, सेनगाव ९२४ मिळून ५,०१९ इतकी आहे. तर कायमस्वरुपी बंद असलेल्या हातपंपांची संख्या हिंगोली १२३, वसमत ४२, औंढा ३२, कळमनुरी १३४, सेनगाव ७२ मिळून ४०३ इतकी आहे. आता अनेक ठिकाणी हातपंपांच्या ऐवजी वीजपंप बसविले जात आहेत. जिल्ह्यात एकूण १६४ ठिकाणी वीजपंप कार्यान्वित आहेत. यामध्ये हिंगोली ३२, वसमत ४०, औंढा ३३, कळमनुरी २७ तर सेनगावात ३२ हातपंप आहेत. तर कायमस्वरुपी बंद असलेल्या वीजपंपांची संख्याही मोठी आहे. यात हिंगोली १९, वसमत ११, औंढा ५, कळमनुरी २४ तर सेनगाव तालुक्यातील ११ हातपंपांचा समावेश आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात ४९ हातपंप दुरुस्त केल्याचे सांगण्यात येते तर एकही वीजपंप दुरुस्त केलेला नाही. तरीही जिल्ह्यातील ६९ हातपंपांची दुरुस्ती करणे बाकी आहे. यामध्ये हिंगोली ९, औंढा ८, कळमनुरी ३२ तर सेनगाव तालुक्यातील २० हातपंपांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील हातपंप दुरुस्तीच्या कामानंतर वसुलीचे प्रमाण कमी असल्याची ओरड नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाली होती. त्यामुळे हातपंप दुरुस्तीसह वसुली करण्याचे आव्हान यांत्रिकी विभागासमोर आहे. भविष्यात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.