विनाअपघात सेवा देण्यात ४६९ चालक पडले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:24+5:302021-02-05T07:53:24+5:30

हिंगोली : एसटी महामंडळाच्या बसची वाहतूक सेवा सुरक्षित समजली जाते. अनेक जण एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. चालकवर्गही विनाअपघात सेवा ...

469 drivers fell without providing accident services | विनाअपघात सेवा देण्यात ४६९ चालक पडले कमी

विनाअपघात सेवा देण्यात ४६९ चालक पडले कमी

हिंगोली : एसटी महामंडळाच्या बसची वाहतूक सेवा सुरक्षित समजली जाते. अनेक जण एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. चालकवर्गही विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी परभणी विभागात केवळ ३८१ चालकांकडूनच विनाअपघात सेवा घडली आहे. यात हिंगोली आगारातील तीन चालकांचा समावेश आहे.

राज्यभरात ‘गाव तेथे एसटी’ असे बिरूद घेऊन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची बस गावागावात सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच गावागावात एसटीचे जाळे पसरले असून, सर्वाधिक प्रवासी वाहतूक एसटी बसच्या माध्यमातून होत असल्याचे पहावयास मिळत आहे. खात्रीशीर प्रवास एसटीचा असला तरी विनाअपघात सेवा देणारे चालक किती आहेत, याचा आढावा घेतला असता परभणी विभागात ३८१ चालकांनी विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, तर ४६९ चालक विनाअपघात सेवा देण्यात कमी पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. परभणी विभागात परभणी व हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात एकूण ८५० चालक कार्यरत आहेत. हिगोली आगारात २३ चालक कार्यरत असून, यातील तिघांनी १५ वर्षापेक्षा जास्त विनाअपघात सेवा बाजावली आहे.

७०ला स्पीड लॉक

एसटी महामंडळाच्या बस क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालविल्या जाऊ नयेत, इंधन कमी लागावे, चालकांचे बसवरील नियंत्रण सुटू नये, या बाबी लक्षात घेऊन बसचा वेग नियंत्रणात असावा यासाठी वाहनांना वेगमर्यादा घालण्यात आली आहे. कमी अंतराच्या वाहनांना ७० किमी प्रतितास तर लांब पल्ल्याच्या वाहनांना ८० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

वर्षभरात ३१ अपघात

परभणी विभागात मागील वर्षभरात ३१ अपघात घडले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्यानेच अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. वर्षभरात मोठा अपघात झाला नाही. मात्र दुचाकीला धडक देणे, चुकून वाहन एसटीच्या समोर येणे, अशा स्वरूपाचे अपघात घडले आहेत. चालकांना महामंडळाच्या वतीने तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच एसटी प्रवास सुरक्षित मानला जातो.

चालक म्हणून नियुक्त झाल्यानंतर चालकांना एसटी विभागाच्या वतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचे मनोबल उंचावे यासाठी दरवर्षी बक्षीसरूपी सत्कार करण्यात येतो. जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-पी.बी. चौथमल, आगारप्रमुख

वाहतुकीचे नियम व प्रवाशांची सुरक्षितता समोर ठेवून बस चालविण्याचा प्रयत्न केला. यामुळेच सलग २० वर्ष विनाअपघात सेवा बजावण्यात यशस्वी झालो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-आर.एम. पठाण, चालक (फोटो आहे.)

सलग अठरा वर्षांच्या सेवेत आतापर्यंत एकही अपघात माझ्या हातून घडला नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन वाहतुकीचे नियम पाळले. वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळेच विनाअपघात सेवा बजावण्यात यश मिळाले.

-डी. एस. ढोणे, चालक

मागील वर्षात परभणी विभागात झालेले अपघात

जानेवारी -२

फेब्रुवारी - ६

मार्च -१

एप्रिल - ०

मे -०

जून- ३

जुलै -०

ऑगस्ट - २

सप्टेंबर - ३

ऑक्टोबर - ५

नोव्हेंबर - ४

डिसेंबर - ५

परभणी विभागातील एसटीचालक

८५०

विनाअपघात बस चालविली म्हणून सत्कार

१० वर्षापेक्षा जास्त सेवा

०१

१५ वर्षापेक्षा जास्त सेवा

०३

Web Title: 469 drivers fell without providing accident services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.