सेनगाव उपविभागात २२६ कोटी रुपये वीजबिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:19 IST2021-03-17T13:18:39+5:302021-03-17T13:19:01+5:30
वीज वितरण कंपनीच्या सेनगाव उपविभागात थकीत वीज बिलाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सेनगाव उपविभागात २२६ कोटी रुपये वीजबिल थकीत
सेनगाव : तालुक्यात ग्राहक वीज देयके नियमितपणे अदा करीत नसल्याने वीज वितरण कंपनी थकबाकीचा आलेख वाढतच असून ही थकबाकी मार्च अखेरपर्यंत २२६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यातुलनेत अपेक्षित वसुली होत नसल्याने महावितरणजवळ वीज तोडणीशिवाय पर्याय उरला नाही. तालुक्यात आजपर्यंत जवळपास साडेतीन हजार ग्राहकांची वीज सेवा तोडण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या सेनगाव उपविभागात थकीत वीज बिलाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वसुलीसाठी कंपनीचे कर्मचारी गांभीर्याने प्रयत्न करीत नाहीत. ग्राहक वीज बिल नियमितपणे भरत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात थकीत वीज बिल वसुलीचा आकडा २२६ कोटी ७ हजार रुपयांवर आहे. त्यात अपेक्षित वसुली मात्र होताना दिसत नसल्याने वीज कंपनीच्यावतीने वसुलीकरीता वीज तोडणीची धडक मोहीम हाती घेतली आहे.
१५ मार्चपर्यंत जवळपास साडेतीन हजार ग्राहकांची वीज तालुक्यातील विविध भागात तोडण्यात आली आहे. १३० गावे असलेल्या सेनगाव उपविभागात घरगुती, औद्योगिक व वाणिज्य असे २३ हजार ९७६ तर कृषीपंप धारक १४ हजार ८२६ तर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे ११६ असे एकूण ३८ हजार ९१८ ग्राहक आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. तालुक्यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे १२ कोटी रुपये तर कृषी पंपाच्या ग्राहकांकडे २०८ कोटी, पाणी पुरवठा योजना असलेल्या ग्रामपंचायतीकडे ६ कोटी ७ हजार रुपये अशी एकूण २२६ कोटी ७ हजार रुपये थकबाकी झाली आहे.
या आर्थिक वर्षांत वसुली व्हावी याकरिता शहरासह ग्रामीण भागात वीज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी दारोदार फिरत आहेत. पण वसुलीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आजपर्यंत झालेल्या वसुलीच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकी असलेली १२ कोटी रुपये वसुली वीज कंपनीला अपेक्षित आहे. परंतु त्यात आजपर्यंत केवळ ८३ लाख रुपये वसुली झाली आहे. कृषीपंपाच्या वसुलीकरीता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार वसुली होत असली, तरी त्यातही समाधानकारक वसुली होत नाही.
१५ मार्चपर्यंत घरगुती, औद्योगिक व वाणिज्य अशा एकूण वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या ३ हजार ५०० ग्राहकांची वीज तोडण्यात आली आहे. येणाऱ्या १५ दिवसांत ही मोहीम अधिक व्यापक करण्याचा इशारा कंपनीच्यावतीने देण्यात आला आहे. अनेक शासकीय कार्यालयांना वीज बिलाची मागणी करण्यात आली आहे. त्यांंचाकडून अपेक्षित वसुली अद्यापपर्यंत आली नाही.
वीज ग्राहकांनी वसुलीसाठी सहकार्य करावे - उपकार्यकारी अभियंता
सेनगाव उपविभागात २२६ कोटी रुपये वीज थकबाकी आहे. कंपनी ग्राहकांना सुरळीत व चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांनी आपल्याकडे असलेल्या थकीत वीज बिलाचा भरणा करावा. जेणेकरून वीज कंपनीला वीज बिल वसुलीसाठी कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. के. लोंखडे यांनी केले.