२११ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST2020-12-26T04:23:44+5:302020-12-26T04:23:44+5:30

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज ...

211 candidates will not be able to contest Gram Panchayat elections | २११ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही

२११ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी तीन तालुक्यांत अर्ज आले. यात कळमनुरी १७, औंढा ११, हिंगोली २२ अशी संख्या आहे. मात्र यंदा विविध अडचणींसह लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोठी धांदल उडत आहे. त्यातच खर्च करण्यासाठी नवीन बँक खाते उघडायला सांगितले असून ते उघडण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. तर जुन्या खात्यात यापूर्वी फारसा व्यवहार नसतानाही हे खाते स्वीकारले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याचीच अनेकांची पंचाईत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर प्रशासनाने उपाय काढणे गरजेचे असून अनेकजण यावरून ओरड करताना दिसत आहेत.

मागच्या वेळीही खर्च वेळेत दाखल न केल्याचे जिल्ह्यात तब्बल २११ प्रकार घडले होते. यात सर्वाधिक ६७ उमेदवार हे हिंगोली तालुक्यातील आहेत. निवडणुकीनंतर सहा महिन्यांपर्यंत खर्च दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदत दिलेली आहे. त्यानंतरही खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांवर कारवाई केली होती. अशांना यावेळी निवडणूक लढता येणार नसून अशा उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसील कार्यालयांना पाठविली आहे. त्यामुळे अशांची यावेळी निवडणूक लढण्याची इच्छा झाली तरीही त्यांना रिंगणात येता येणार नाही.

५० हजारांची खर्च मर्यादा

ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराला ५० हजारांपर्यंतचा खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे जेथे लहान ग्रामपंचायती आहेत, तेथे ५, ७, ९ तर मोठ्यांत ११, १३, १७ अशी सदस्य संख्या आहे

पॅनलप्रमुखांना जास्त सदस्य संख्येच्या गावांत प्रति सदस्याप्रमाणे जास्त खर्च करता येणार आहे. मात्र अनेक गावांत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाला तरीही तो कागदावर काही येत नाही. अनेकांचे खर्च तर आताच सुरू झाले आहेत.

Web Title: 211 candidates will not be able to contest Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.