कोविड सेंटरमधील कंत्राटी १७४ कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:24+5:302020-12-29T04:28:24+5:30
हिंगोली : सध्या कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात कंत्राटी भरती करून कोराेनावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आराेग्य विभागावर आली ...

कोविड सेंटरमधील कंत्राटी १७४ कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी
हिंगोली : सध्या कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात कंत्राटी भरती करून कोराेनावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आराेग्य विभागावर आली आहे. तर इतरही अनेकजण १० ते २२ वर्षांपासून आरोग्य विभागात कंत्राटी सेवा देत असून, या सर्वांकडून आता कायम सेवेत घेण्याची मागणी होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या काळात नियमित रुग्णालयाचे काम सांभाळून कोरोनाच्या वाॅर्डात काम करणे शक्य नसल्याने डाॅक्टर, परिचारिकांसह इतर अनेकांच्या नेमणुका कराव्या लागल्या. त्यातही अनेकदा जाहिरात देऊनही डाॅक्टर, परिचारिका मिळत नसल्याचा अनुभव आला. तरीही हिंगोली जिल्ह्यात कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी २७, स्टाफ नर्स ४७, वाॅर्ड टेक्निशियन १५ असी पदे कंत्राटी तत्त्वावर भरली गेली आहेत. याशिवाय आऊटसोर्सिंगद्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटरची १८, तर सफाईगारांची ८७ पदे भरली गेली आहेत. काेरोनाचा कहर कमी होताच इतर जिल्ह्यांमध्ये अनेक कंत्राटींना घरी बसविण्यात आल्याचा प्रकार घडला. हिंगोलीत मात्र मनुष्यबळ अपुरे असल्याने कंत्राटींवर अजून तरी गंडांतर आले नाही. मात्र, ही कंत्राटी मंडळी आता आम्हाला सेवेत कायम करण्याची मागणी करीत आहेत. आरोग्य सेवा सक्षम नसल्याने कोरोनासारखी महामारी आली की, आरोग्य विभागाकडून सर्व उपाय करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, आधीच तयारी असेल तर अशा प्रसंगात अडचण येत नाही.
एनआरएचएम, एड्स नियंत्रण, क्षयरोग निर्मूलन, तंबाखू नियंत्रण, सिकल सेल नियंत्रण, कुष्ठरोग नियंत्रण, प्रधानमंत्री मातृवंदन आदी विभागांमध्येही शेकडो कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेकांची १० ते २२ वर्षांपर्यंतची सेवाही झाली आहे. मात्र, या लोकांना अद्याप शासनाने कायम केलेले नाही. त्यांचाही लढा अनेक दिवसांपासून सुरू आहे. एनआरएचएम या विभागातील कर्मचाऱ्यांना तर केंद्र शासनाने राज्याची संमती असल्यास कायम करण्याची तयारीही दाखविली होती. मात्र, त्यालाही आठ वर्षे उलटले आहेत.
कोविड सेंटरमध्ये कायम कमी अन् कंत्राटी जास्त
हिंगोली जिल्ह्यात कोरोना काळात जवळपास १७४ कंत्राटी कर्मचारी घेतले. समुदाय आरोग्य अधिकारी, विविध विभागातील कंत्राटी कर्मचारी असे मिळून ५०० ते ६०० कर्मचारी राबत आहेत. प्रत्यक्ष कोरोनाच्या ड्युटीवर असलेले नियमित शासन सेवेतील मनुष्यबळ १५० ते १८० च्या दरम्यानच आहे. त्यामुळे कोविड सेंटरचा भार सगळीकडे कंत्राटींवरच जास्त प्रमाणात असल्याचे चित्र आहे. त्यांना वगळले तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य आहे.
एनआरएचएमचे ५२४ कर्मचारीही प्रतीक्षेत
एनआरएचएममध्येही ११ महिन्यांच्या कंत्राटावर जवळपास ५२४ कर्मचारी विविध विभागात कार्यरत आहेत. यात डीपीएम, डाॅक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, जीएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखापाल, वर्ग ४ कर्मचारी, आशा समन्वयक, विविध विभागातील समन्वयक अशा पदावर हे कर्मचारी कार्यरत आहेत.
कोरोनात आमची निवड झाली असून, तीन महिन्यांचा बाॅण्ड केला. कोरोनानंतर आमचे समकक्ष इतर रिक्त पदावर समायोजन करावे, आमचा बाॅण्ड अनुभवासाठी ग्राह्य धरावा, तसेच ठराविक प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात.
- डाॅ. हर्षल राऊत,
कंत्राटी डाॅक्टर
काेरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून कोविड सेंटरमध्ये सेवा देत आहे. दर सहा महिन्यांनी आमचा बाँड तयार केला जातो. काही कर्मचाऱ्यांना हा बाँड वेळेत मिळत नाही. शिवाय प्रत्येकवेळी ठिकाण बदलल्याने त्रास होतो.
- भीमराव खेबाळे,
कंत्राटी कर्मचारी