मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा ताठ उभे राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:43 IST2017-07-26T15:24:37+5:302017-07-26T18:43:16+5:30
गोड्या पाण्यातील झेब्राफिश मासा करणार मदत!

मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा ताठ उभे राहणार!
- मयूर पठाडे
पाठीच्या मणक्याच्या आजारानं किती जण अंथरुणाला खिळून पडले असतील? किती जणांचं भविष्य त्यामुळे अंधारात खितपत पडलं असेल? किती जणांना त्यामुळे पुढचं सारं आयुष्य व्हिलचेअरवरच काढावं लागत असेल?..
भारतात आणि जगातही अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: अपघातामुळे पाठीच्या मणक्याला दुखापत झाली की पक्षाघातामुळे अनेकांना मग चालणं, फिरणं, हालचाली करणं अशक्य होतं.. आणि आयुष्यभराचं अपंगत्व त्यांच्या नशिबी येतं..
अनेक प्रसिद्ध लोकांनाही याचा सामना करावा लागला आहे. रुपेरी पडद्यावर ‘सुपरमॅन’ साकारणारा प्रसिद्ध अभिनेता ख्रिस्तोफर रिव्ह या अभिनेत्यालादेखील मणक्यांच्या दुखापतीमुळे तब्बल नऊ वर्षे व्हिलचेअरला खिळून राहावं लागलं होतं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं होतं. एका घोडेशर्यतीत भाग घेतल्यानंतर घोड्यावरुन पडल्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे पुढचं सारं आयुष्य त्याला व्हिलचेअरवरच काढावं लागलं होतं. एक पोर्टेबल व्हेंटिलेटरही त्याला बसवावा लागला होता.
भारतात तर अपघातांची संख्या खूपच मोठी आहे आणि या अपघातांमुळे पाठीच्या मणक्यांना गंभीर मार बसून अंथरुणाला खिळून बसलेल्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. पाठीचा मणका, एकदा का खराब झाला, की त्यावर दुसरा उपाय नाही, पण या साºया लोकांसाठी खुशखबर आहे.
शास्त्रज्ञ बºयाच वर्षांपासून यावर संशोधन करीत आहेत आणि त्यावर मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि या संशोधनाला मदत केली आहे तीदेखील झेब्राफिश या माशाने!
काय आहे संशोधन?
१- संशोधन करीत असताना शास्त्रज्ञांना लक्षात आलं की झेब्राफिश मासा अतिशय विलक्षण आहे. उष्ण कटिबंधातील गोड्या पाण्यात राहाणारा हा मासा आहे.
२- या माशाच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, तरीही त्याच्यात अशी क्षमता आहे की ही दुखापत तो स्वत:हून काही आठवड्यात बरी करू शकतो.
३- झेब्राफिशच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यास ‘फायब्रोब्लास्टस’ नावाच्या पेशी ही दुखापत बरी करण्यासाठी सरसावतात आणि इजा झालेल्या भागात तयार व्हायला लागतात.
४- या फ्रायब्रोब्लास्टस पेशी ‘कोलॅजेन १२’ नावाचे मॉल्यूक्युल्स तयार करतात. मज्जातंतूची रचना हे मॉल्यूक्युल्स बदलतात.
५- यामुळे दुखापतग्रस्त भागातील मज्जातंतू पुन्हा पुनरुज्जिवित होतात आणि शरीरातील संपर्क पुन्हा साधतात.
६- युनिव्हर्सिटी आॅफ एडिनबर्गच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं असून हा खूप मोठा संदर्भ आपल्या हाती लागला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मेंदू आणि स्रायू यांच्यातील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. पाठीच्या मणक्यांच्या दुखापतीमुळे रुग्णशय्येवर पडून असलेल्यांना त्याचा खूपच मोठा फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीनं आता पुढील संशोधन सुरू आहे.