WHO Director in Gujarat: डब्ल्यूएचओ प्रमुख उद्या गुजरातला येणार; नरेंद्र मोदींची भेट घेणार, विविध कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 22:54 IST2022-04-17T22:54:14+5:302022-04-17T22:54:58+5:30
भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस भारत दोऱ्यावर येत आहेत.

WHO Director in Gujarat: डब्ल्यूएचओ प्रमुख उद्या गुजरातला येणार; नरेंद्र मोदींची भेट घेणार, विविध कार्यक्रम
कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीला चीनवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस उद्यापासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच ते भारत दोऱ्यावर येत आहेत.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींसोबत घेब्रेसियस काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. घेब्रेसियस १८ एप्रिलला राजकोटला येणार आहेत. यानंतर ते जामनगरमध्ये मोदींची भेट घेतील. इथे पारंपरिक औषधांचे डब्ल्यूएचओकडून जागतिक केंद्र सुरु केले जाणार आहे. या इमारतीचा कोनशिला ठेवली जाणार आहे.
राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू यांनी रविवारी सांगितले की, GCTM हे पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असेल. घेब्रेयसस गुरुवारी गांधीनगरला जाणार आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. आयुष गुंतवणूक आणि शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राजकोटचे महापौर प्रदीव दाव म्हणाले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचतील. येथे त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना बळींचा नेमका आकडा किती?
भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा 5.20 लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, या महामारीमुळे देशात 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेसने केंद्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.