We ingest 5 grams plastic every week says report | धक्कादायक! पाण्यासोबत एका क्रेडिट कार्डएवढं प्लास्टिक जातं आपल्या शरीरात
धक्कादायक! पाण्यासोबत एका क्रेडिट कार्डएवढं प्लास्टिक जातं आपल्या शरीरात

पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? हे पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी त्यामार्फत तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढ्या प्लास्टिकचा समावेश होत आहे. एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे की, 7 दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये जवळपास 5 ग्रॅम प्लास्टिकचा समावेश होतो. या प्लास्टिकचा सर्वात मोठा स्त्रोत बाजारात मिळणारं बॉटलमधील मिनरल वॉटर आणि घरामध्ये नळांमधून येणारं पाणी आहे. ज्यामध्ये प्लास्टिकचे छोटे-छोटे कण आढळून येतात. 

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, पाण्यामध्ये प्लास्टिकचे कण असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा रिपोर्ट युनिवर्सिटी ऑफ न्यूकॅसल आणि ऑस्ट्रेलियासहित जगभरामध्ये करण्यात आलेल्या 52 संशोधनांवर आधारित आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या इंटरनॅशनल डायरेक्टर जनरल मार्को लँबरटिनी यांनी सांगितले की, प्लास्टिकमुळे फक्त महासागरालाच नाही तर मानवाच्या शरीरालाही धोका पोहोचत आहे. 

दरवर्षी 250 ग्रॅमपेक्षा जास्त प्लास्टिक 

रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला प्लास्टिकचे जवळपास 2000 छोटे कण प्रवेश करतात. प्रत्येक महिन्याला जवळपास 21 ग्रॅम प्लास्टिक आपण खात आहोत. यानुसार एका वर्षात आपण जवळपास 250 ग्रॅमपेक्षाही जास्त प्लास्टिकचा आपल्या शरीरामध्ये समावेश होतो.  दरम्यान पहिल्यांदाच एखाद्या एखाद्या रिपोर्टमध्ये पाण्यामध्ये प्लास्टिक असण्याची बाब समोर आली आहे. 

या कारणांमुळे आपण प्लास्टिक खात आहोत...

यूनिवर्सिटी ऑफ न्यूकॅसल आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शरीरामध्ये प्लास्टिक असण्याला अनेक गोष्टीं कारणीभूत असल्याचे सांगितले. यांपैकी एक गोष्ट म्हणजे, समुद्रामध्ये राहणाऱ्या शेलफिशदेखील आहेत. जेव्हा आपण हे शेलफिश खातो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये प्लास्टिकचाही अंश जात असतो. याव्यतिरिक्त बियर आणि मिठामध्येही प्लास्टिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

अमेरिकेमध्ये एवढं प्लास्टिक खात आहेत लोक...

संशोधनामध्ये असं सांगितलं आहे की, अमेरिकेमध्ये 130 मायक्रोन्स पेक्षा लहान जवळपास 45000 पार्टिकल्स दरवर्षी माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. येथे नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक फायबर असतं. यूनिवर्सिटी ऑफ ईस्ट अंगालियाचे प्रोफेसर ऐलेस्टर ग्रांट यांनी एजंसी फ्रान्स प्रेस यांच्याशी बोलताना सांगितले की, 'पाण्यामध्ये प्लास्टिक असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु, मला असं वाटतं की, यामुळे मानवाच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतात.'

टिप : वरील सर्व बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 


Web Title: We ingest 5 grams plastic every week says report
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.