आपल्या जीवनशैलीतून निसर्ग, झाडं हद्दपार झाली आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:51 IST2017-08-03T13:50:37+5:302017-08-03T13:51:39+5:30
..माणसाच्या जगण्यातला आॅक्सिजनही संपला!

आपल्या जीवनशैलीतून निसर्ग, झाडं हद्दपार झाली आणि...
- मयूर पठाडे
सर्व काही तयार, आयतं, रेडिमेड हवं असण्याच्या हव्यासापायी आपण आपली नैसर्गिक जीवनशैलीच विसरुन गेलो आहोत. निसर्गापासूनही आपण दूर जात आहोत.
रिकाम्या जागांवर इमारती उभ्या राहताहेत, रिकामी दिसणारी इंच न् इंच जागा केवळ माझ्याच मालकीची असावी या हव्यासापोटी झाडांचा गळा घोटला जातोय. अख्ख्या जगात झाडांची, जंगलांची कत्तल सुरू आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग पार उघडबोडका, बेचिराख होतोय. पण निसर्गाला ओरबाडून विकास कधीही साध्य होऊ शकत नाही. वेळोवेळी ते सिद्धही झालं आहे.
घ्रर बांधायचंय, मंदीर बांधायचंय, नवा रस्ता करायचंय, रस्त्यांचं रुंदीकरण करायचंय, किती सहजपणे आपण झाडांची कत्तल करतो?
.. पण या झाडांचा आपल्याला किती उपयोग आहे, एक झाड जरी तोडलं गेलं तर किती हानी होते याचा साधा विचार तरी आपण करतो का?
पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या जीवनशैलीत झाडांचा वापर केला होता. वटसावित्री पौर्णिमेपासून तर नागपंचमीपर्यंत अनेक सणही झाडांशी बांधलेले आहेत.
एक झाड आपल्याला काय देतं?
१- एका झाडापासून चार चार माणसं जिवंत राहू शकतील इतका आॅक्सिजन मिळतो.
२- दहा खोल्यांमध्ये तब्बल वीस तास एसी चालवल्यानंतर जेवढा थंडावा निर्माण होईल तेवढा थंडावा एक झाड निर्माण करू शकतं.
३- एक कार ४१ हजार किलोमीटर चालवल्यानंतर जितका कार्बनडायआॅक्साईड सोडेल, तेवढा सारा कार्बन डायआॅक्साईड केवळ एका एकरातील झाडे एका वर्षात शोषून घेतात.
४- पाणी धरुन ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम झाडांमुळे होतं. झाडांची मुळं अतिशय खोलवर जातात. त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी खूपच उपयोग होतो. दक्षिण आफ्रिकेतील एका अंजीरच्या झाडाची मुळे तर ४०० फूट खोल गेलेली आढळून आली आहेत.