रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ‘जे जे’मध्ये ट्रेनिंग सुरू; सिम्युलेटरचा वापर, नवीन वर्षात श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:26 IST2024-12-14T08:25:53+5:302024-12-14T08:26:09+5:30
रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ‘जे जे’मध्ये ट्रेनिंग सुरू; सिम्युलेटरचा वापर, नवीन वर्षात श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांचा चमू रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतात. हे नेहमीचे दृश्य. मात्र, या चमूमध्ये आता रोबोचाही समावेश होणार आहे. नव्या वर्षात जे जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जेजेतील अध्यापकांना दिले जात आहे. त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जात आहे.
रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु, या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात यासाठी आता जेजेमध्ये त्याची सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने जे जेमध्ये रोबोही घेतला आहे.
त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महामुंबई क्षेत्रात रोबो खरेदी करणारे ‘जेजे’ हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
वेदना कमी होण्यास मदत
शस्त्रक्रियेच्या प्रचलित पद्धतीला छेद देत बहुतांश ठिकाणी आता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. पोटावर एक किंवा दोन छिद्रे करून या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यापुढे जाऊन प्रगत देशांत करण्यात येणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयांत होत आहेत.
या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो.
रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात करण्याआधी डॉक्टरांना प्रशिक्षित हाेणे गरेजेचे आहे. रोबोच्या तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी कार्यशाळेत उपस्थित राहावे लागते. त्यानंतर मृतदेहावर रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक केले जाते. या प्रक्रियेनंतर रोबोटिक सर्जन म्हणून डॉक्टरांना प्रमाणपत्र दिले जाते. यासंदर्भातील सर्व नियोजन रोबो पुरविणारी कंपनी करते. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत परिचारिका व टेक्निशियनलाही प्रशिक्षण बंधनकारक आहे.
- डॉ. अजय भंडारवार, विभागप्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, सर जे जे रुग्णालय