तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:40 IST2025-05-06T05:40:45+5:302025-05-06T05:40:50+5:30
वॉशिंग्टनमध्ये विज्ञानविषयक सत्रात संशोधनाचे हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंबाखूमुळे लागणारी तंद्री आणि गांजाची तलब ही हृदयरोगांना आमंत्रण ठरत असून, पाच वर्षांत हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात ५० टक्के वाढ होऊ शकते. वॉशिंग्टनमध्ये विज्ञानविषयक सत्रात संशोधनाचे हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
अभ्यासात स्पष्ट करण्यात आले की, तंबाखूमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे दोष ४० टक्के वाढतील, तर गांजामुळे हृदयविकारांचे प्रमाण ५० टक्के वाढण्याची भीती आहे. हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताच्या गुठळ्या, हृदय ठोक्यांतील अनियमितता वाढण्याचाही धोका संभवतो. ‘सोसायटी फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर अँजिओग्राफी अँड इंटरव्हेन्शन्स-२०२५’च्या विशेष सत्रात संशोधनातून केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष मांडण्यात आले.
हे आढळले दुष्परिणाम
तंबाखू आणि गांजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांत प्रामुख्याने रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे हृदय कमकुवत होत आहेत.
असा केला अभ्यास
वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका पथकाने हृदयरोगांमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी पडताळून हा अभ्यास केला.
५०%
रुग्णांत रक्तपुरवठ्याअभावी पेशी मृत होण्याचा धोका.
४८%
रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होण्याची जोखीम.
२७%
रुग्णांत हृदयविकाराच्या झटक्याची जोखीम.