मुंबई - सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हिवाळ्यात तापमान घसरल्यामुळे शरीराचे तापमानही कमी होते. शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो. शरीराची गरज म्हणून भूक वाढते. ती शमविण्यासाठी अतिरिक्त अन्नाचे सेवन केले जाते. परिणामी वजन वाढते. त्यामुळे या काळात कोणता आहार आपण घेत आहोत आणि आपण शरीराची किती हालचाल करत आहोत, या बाबी महत्त्वाच्या असतात, असे डॉक्टर सांगतात.
हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होतेहिवाळ्यात अनेकवेळा कर्बोदके खाण्याची इच्छा होते. गोड खाणे वजनवाढीसाठी कारणीभूत असतात. काही वेळा गोड पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्या प्रमाणात वाढते तशी ती कमीही होते. मात्र इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे अनेकवेळा भूक लागते.
काय करावे?खाण्याच्या वेळा ठरवून घ्या अन्नात प्रोटीनचा वापर करा नियमित व्यायाम करा पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे
हिवाळ्यातच असे का घडते?हिवाळ्यात शरीराची ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र ती मिळविण्यासाठी अनेकवेळा खाण्याची इच्छा होते. काही कुटुंबांत थंडीचे आगमन झाल्यावर विविध पदार्थ बनविण्याची परंपरा आहे. थंडीत डिंकाचे, मेथीचे लाडू खाणे आरोग्यदायी असते, असे समजले जाते. तीळपोळी, गुळपोळीचे सेवन सुद्धा या काळात अधिक प्रमाणात होते.
हिवाळ्यात भूक अधिक लागते, त्यामागे शास्त्रीय आणि सामाजिक अशी दोन्ही कारणे आहेत. ऊर्जानिर्मितीसाठी अधिक खाल्ले जाते. तसेच हिवाळ्यात सण येतात, लग्नसराई असते. त्यामुळे गोड पदार्थ अधिक खाल्ले जातात. वजनवाढीस ते कारणीभूत ठरतात. त्याचे दुष्परिणाम नंतर दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात अशा पदार्थांची चव घ्यावी, मात्र ते अधिक प्रमाणात खाऊ नयेत. आपला नियमित पौष्टिक आहार घ्यावा. विशेष म्हणजे या काळात व्यायाम करावा. आहारावर नियंत्रण हाच खरा मंत्र आहे. - डॉ. प्रवीण राठी, विभागप्रमुख गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, नायर रुग्णालय