आतापर्यंत आपण अनेक आजारांबाबत ऐकलं आहे. तसेच अनेक सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या इन्फेक्शनबाबतही ऐकलं आहे. पण तुम्ही कधी मेंदू खाणाऱ्या अमिबाबाबत ऐकलं आहे का? अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीच्या मेंदूमध्ये एका अशा अमिबाने प्रवेश केला आहे, जो हळूहळू तिचा मेंदू खात आहे. प्रचंड डोकेदुखी आणि सतत येणारा ताप यांमुळे लिलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या ती कोमामध्ये असून डॉक्टर्स तिला बरं करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नही करत आहेत. nytv.com ने दिलेल्या वृत्तानुसार, यूएसमध्ये 1962 पासून आतापर्यंत असाप्रकारच्या अमिबामुळे 145 लोक शिकार झाले असून त्यांच्यापैकी फक्त 4 लोक बचावले आहेत. लिलीचे कुटुंबिय तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
टेक्सासमधील कुक चिल्ड्रन्स मेडिकल सेंटरमध्ये 10 वर्षांच्या लिलीला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होत होता. तसेच तिला तापही भरपूर होता. एवढचं नाहीतर ती बेशुद्ध असून त्याच अवस्थेत बरळतही होती. यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. सध्या लिलीवर उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
लिलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, लिली नेगलेरिया फाउलरली नावाच्या एका सिंगल सेल लिविंग ऑर्गेनिजम म्हणजेच, एकपेशी जिवंत जीवाच्या संपर्कात आली आहे. साधारणतः हा जीव स्वच्छ आणि ताज्या पाण्यामध्ये आढळून येतो. हे अमिबा मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होतं.
सेंट्रल ऑफ डिजीज कंट्रोलनुसार, या अमिबाचा संसर्ग लोकांना खासकरून स्विमिंग करताना होतो. तेव्हा नेगलेरिया फाउलरली त्यांच्या नाकामध्ये प्रवेश करून त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशींना खाण्यास सुरुवात करतो. अशाप्रकारच्या अमिबाच्या संपर्कात येणाऱ्या 97 टक्के व्यक्तींचं वाचणं जवळपास अशक्यच असतं.
लिलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लिली आपल्या पालकांसोबत तिच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या ब्रजोस नदीमध्ये स्विमिंग करण्यासाठी गेली होती. त्यावेळी जवळपास 40 लोक नदीमध्ये पोहोण्याचा आनंद घेत होते. घरापासून अगदी जवळ असल्यामुळे लिली नेहमीच तिथे पोहोण्यासाठी जात असे. परंतु, स्विमिंग करून घरी परतल्यानंतर तिचं डोकं प्रचंड दुखू लागलं आणि तिला फार तापही आला होता. त्यामुळे तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरू करून तिला मिल्टेफोसिन नामक अमिबाशी लढण्यासाठी असलेली औषधं देण्यात आली.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही प्रेश आणि स्वच्छ पाण्यामध्ये पोहत असाल तर नोज क्लिप किंवा मास्कचा वापर करणं अजिबात टाळू नका. तुम्ही जास्त वेळ तुमचं डोकं पाण्याच्या आतमध्ये ठेवणं टाळा. कारण हा अमिबा नाकामार्फत मेंदूमध्ये प्रवेश करत असून तो कालांतराने मेंदूच्या नसांना डॅमेज करू लागतो.
(टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)