दररोज सोडा प्यायल्याने केवळ वजन वाढून तुम्ही लठ्ठपणाचेच शिकार होता असे नाही तर तुम्हाला कॅन्सर होण्याचाही धोका अनेक पटीने वाढतो. असा दावा आम्ही नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. मात्र त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या कॅटेगरीमध्ये केवळ सोडाच नाही तर फ्रूट ज्यूसचाही समावेश आहे.
दर दिवशी सोडा प्यायल्याने वाढतो धोका
theguardian.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर एखादी व्यक्ती दररोज केवळ १०० मिली सोड्याचं सेवन करत असेल तर त्या व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर विकसित होण्याचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, दररोज सोड्याचं सेवन केल्याने एकट्या ब्रेस्ट ट्यूमरचा धोका २२ टक्क्यांनी वाढतो. अभ्यासकांना आढळले की, केवळ सोडाच नाही तर गोडवा असणारे ज्यूसही आरोग्यासाठी हानिकारक असतात. दररोज गोडवा असलेल्या ज्यूसचं सेवन केल्याने कॅन्सरचा धोका होतो, असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.
गोड असलेले ज्यूस आणि कॅन्सरमध्ये कनेक्शन
हा रिसर्च फ्रान्समध्ये करण्यात आला. यात न्यूट्रिशन आणि हेल्थ यांच्यातील संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून अभ्यासकांनी ही माहिती मिळवली की, स्वीट ड्रिंक्स म्हणजे असे ड्रिंक्स ज्यात गोडवा असतो, त्यांच्यात आणि कॅन्सरमध्ये कनेक्शन आहे. या रिसर्चचे निष्कर्ष स्पष्टपणे हे दाखवतात की, फ्रूट ज्यूस जे जगभरात हेल्दी सांगून प्रमोट केले जातात, ते मुळात आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत.
१ लाख लोकांवर रिसर्च
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ९७ पेय पदार्थ आणि १२ आर्टिफिशिअल स्वीटेंड पेय पदार्थांची तपासणी केली. त्यात कार्बोनेटेड ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, सिरप आणि प्योर फ्रूट ज्यूस यांचा समावेश केला होता. या रिसर्चचे लेखक म्हणाले की, रिसर्चच्या डेटामधून हे दिसतं की, न्यूट्रिशनल रेकमेंडेशन हेच आहे की, लोकांनी दररोज गोड ड्रिंक्सचं सेवन करणं नियंत्रित केलं पाहिजे. ज्यात १०० टक्के ज्यूसचाही समावेश आहे. २००९ पासून सुरू असलेल्या या रिसर्चमध्ये साधारण १ लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.