कोविड रुग्णांमध्ये अँटिबॉडीज वाढवणाऱ्या औषधाचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 07:25 AM2021-07-13T07:25:07+5:302021-07-13T07:25:51+5:30

Coronavirus Patients Antibodies : सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशे रुग्णांवर यशस्वी उपचार.

Successful experiment of antibody enhancing drug in covid patients mumbai seven hills hospital | कोविड रुग्णांमध्ये अँटिबॉडीज वाढवणाऱ्या औषधाचा प्रयोग यशस्वी

कोविड रुग्णांमध्ये अँटिबॉडीज वाढवणाऱ्या औषधाचा प्रयोग यशस्वी

Next
ठळक मुद्देसेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशे रुग्णांवर यशस्वी उपचार

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरणाबरोबरच आणखी अनोखे प्रयोग मुंबई पालिकेने सुरू केले आहेत. कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या उपचार पद्धतीचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्‍वी ठरला आहे. हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर  एकाच (०.५ टक्‍के) रुग्‍णास ऑक्सिजनची गरज भासली, तर मृत्‍यूदरामध्‍ये ७० टक्‍के घट झाली आहे. रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधीही १३ ते १४ दिवसांवरून पाच ते सहा दिवसांवर आला आहे.

कॅसिरीव्‍हीमॅब व इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रण सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयातील आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना सलाइनद्वारे देण्‍यात आले. यापैकी १९९ रुग्‍णांचे उपचारअंती निष्‍कर्ष प्राप्‍त झाले. त्‍याचा अभ्‍यास करण्‍यात येत आहे. अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर २०२० पासून या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोविडबाधित झाल्‍यानंतर त्‍यांना हेच मिश्रित औषधोपचार दिले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये वेगाने सुधारणा झाली. देशात १० मे २०२१ रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे याची नोंदणी होऊन औषधी महानियंत्रकांनी मान्‍यता दिली आहे.

या मिश्रणाचा यांना फायदा
१२ वर्षांपेक्षा अधिक वय आणि ४० किलोपेक्षा जास्‍त वजन असलेल्या बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका असलेल्या गटातील बाधित रुग्‍णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी असूनही उपचार करणे शक्‍य होते.

असे काम करते मिश्रण
हे मिश्रित औषध सलाइनद्वारे देण्‍यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्‍या कालावधीत संबंधित रुग्‍णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्‍णालयात दाखल करून न घेता, ओपीडीमध्ये हे औषध देणे शक्‍य आहे. रेमडेसिविरसारखी औषधं आणि स्‍टेरॉइडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्‍य असल्‍याने रुग्‍णांना अर्थाने दिलासा मिळतो. हे औषधोपचार आर्थिकदृष्‍ट्या रुग्‍णांना फायदेशीर ठरणारे आहेत, तर डॉक्‍टरांवरील कामकाजाचा ताणही निवळण्‍यास मदत होणार आहे.
१९९ रुग्‍णांमध्‍ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील १०१ रुग्‍ण, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ४५ रुग्‍ण तर ६० वर्षे वयोगटावरील ५३ रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण १९९ पैकी ७४ जणांना किमान एक तरी सहव्‍याधी आहे. हे सर्व १९९ रुग्‍ण सौम्‍य ते मध्‍यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरू करतेवेळी या यापैकी १७९ जणांना ताप, १५८ जणांना तापेसह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्‍याचा त्रास होत होता. तसेच चार रुग्‍णांना ऑक्‍स‍ि‍जन पुरवठा करावा लागणार होता.

असा आहे निष्कर्ष....

  • मिश्रित औषध दिल्‍यानंतर अवघ्‍या ४८ तासांतच रुग्‍णांना ताप येणे थांबले. 
  • १९९ पैकी फक्‍त एकाच व्‍यक्‍तीला पुढे प्राणवायू पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे ०.५ टक्‍के आहे. 
  • पहिल्‍या व दुसऱ्या लाटेमध्‍ये किमान २० टक्‍के रुग्‍णांना प्राणवायू द्यावा लागत होता, तर पाच टक्‍के रुग्णांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागत होते. 
  • या औषधांचे साइड इफेक्ट नसून मृत्‍यूंचे प्रमाण तब्‍बल ७० टक्‍क्‍यांनी घटले आहे.

Web Title: Successful experiment of antibody enhancing drug in covid patients mumbai seven hills hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app