(Image Credit : sentinelassam.com)
कामाचा वाढता ताण, अपेक्षांचं ओझं, जबाबदाऱ्यांचं ओझं अशा वेगवेगळ्या कारणांनी अनेकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. खासकरुन महिला अधिक तणावग्रस्त होत आहेत. याचं कारण घर आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या असू शकतात किंवा एखादी शारीरिक समस्या असू शकते.
यावर तज्ज्ञ लोक वेगवेगळे उपायही सांगतात. पण एका रिसर्चमधून तणाव दूर करण्यासाठीचा एक वेगळाच आणि विचित्र असा उपाय समोर आला आहे. खरंतर हे वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. पण महिला तणाव दूर करण्यासाठी त्यांच्या बॉयफ्रेन्ड किंवा पतीचं शर्ट किंवा टी-शर्टचा गंध घेतात. याने तणाव दूर होतो असा दावा करण्यात आला आहे.
आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर की, शर्ट किंवा टी-शर्टचा गंध घेऊन तणाव कसा दूर केला जाऊ शकतो? तर या शोधात सांगण्यात आलं आहे की, जेव्हा महिला त्यांच्या पतीचा किंवा बॉयफ्रेन्डचा गंध घेतात, मग तो त्यांच्या शरीराचा असो वा शर्टचा असो त्यांना मानसिक रुपाने आराम आणि शांतता मिळते.
काय सांगतो शोध?
कॅनडातील यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियाची विद्यार्थिनी आणि या रिसर्चची मुख्य लेखिका मार्लिस होफर हिने सांगितले की, 'अनेक महिला त्यांच्या पार्टनरची टी-शर्ट परिधान करतात किंवा जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांच्याजवळ नसतात तेव्हा त्या बेडच्या त्या बाजूला झोपतात जिथे नेहमी त्याचा पार्टनर झोपतात'. पण महिला अशा का करतात? चला जाणून घेऊ याचं कारण.
गंधाचं कनेक्शन तणावाशी कसं?
अभ्यासिका होफरला या रिसर्चमधून हे जाणून घेण्यास मदत मिळाली की, पती किंवा बॉयफ्रेन्डचा गंध एक शक्तीशाली उपकरणाप्रमाणे काम करतो. खासकरुन तेव्हा जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ नसतो. त्यांचा ओळखीचा गंध ते आजूबाजूला असल्याची जाणीव करुन देतात, ज्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. याने त्या आनंदी राहतात आणि त्यांचा तणाव कमी होतो.
सोबतच या रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, जेव्हा आजूबाजूला एखादा अनोळखी व्यक्तीचा गंध असतो तेव्हा तणाव कमी होण्याऐवजी वाढतो. अशा गंधामुळे महिलांमध्ये तणावासाठी कारणीभूत हार्मोन कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं. हा अनोळखी गंध पुरुषांचा असेल तर तणाव अधिक वाढतो. म्हणजे यापुढे जर तुम्हाला तणावमुक्त रहायचं असेल तर या रिसर्चनुसार, तुम्ही पतीच्या शर्टाचा गंध घेतात.