आपल्यापैकी अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची, सकाळी लवकर उठण्याची किंवा आठवड्याच्या शेवटी राहिलेली झोप पूर्ण करण्याची सवय असते. मात्र एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तुम्ही नेमकं किती तास झोपता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कमी आणि जास्त झोपेच्या कालावधीचा मृत्यूशी संबंध जोडलेला आहे. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. झोप तुम्हाला अत्यंत सामान्य वाटत असेल पण ती आयुष्यातील सर्वात शक्तिशाली औषधांपैकी एक असू शकते.
एक काळ असा होता जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागणं, मध्यरात्रीपर्यंत काम करणं, प्रोजेक्ट पूर्ण करणं, बाळाला झोपवणं हे महत्त्वाचं मानलं जायचं. पण आता दुसरीकडे, उशिरापर्यंत झोपणं हे आरामाचं लक्षण किंवा आळस म्हणून पाहिलं जातं. याच दरम्यान संशोधकांनी अनेक दशकांच्या ७९ गट अभ्यासांमधून निष्कर्ष एकत्रित केले आहेत आणि त्याचे निकाल चिंताजनक आहेत.
पबमेडमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यूनुसार, जे नियमितपणे रात्री सात तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना शिफारस केलेल्या सात ते आठ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांच्या तुलनेत मृत्यूचा धोका १४% जास्त असल्याचं आढळून आलं. जे दररोज रात्री नऊ तास किंवा त्याहून अधिक झोपतात त्यांच्यासाठी हा धोका ३४% पर्यंत वाढला. पुरुषांपेक्षा जास्त झोपेमुळे महिलांना जास्त त्रास होतो हे समोर आलं आहे.
तुमच्या विश्रांतीचा वेळ शरीराच्या विविध कार्यांवर परिणाम करतो हे लक्षात घेता स्लीप फाउंडेशन असं सुचवतं की, झोप शरीराला विश्रांती देण्यसोबतच बरंच काही करते, ती मेमरी, मूड, मेटाबॉलिज्म आणि हृदयाच्या आरोग्याला सपोर्ट करते. झोप कमी केल्याने ब्लड शुगर लेव्हल बिघडू शकते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि हृदयावर ताण येऊ शकतो. प्रत्येक शरीराची स्वतःची पद्धत असली तरी, बहुतेक निरोगी लोकांना रात्री ७ ते ९ तास झोप आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यात नियमितता असण्याची आवश्यकता आहे. खूप कमी आणि जास्त झोपेमधील अंतर, विशेषतः कालांतराने शरीराला गोंधळात टाकणारे संकेत पाठवू शकतं.
चांगल्या झोपेसाठी टिप्स
उठण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित करा
सकाळी किती वाजता उठायचं आणि रात्री कधी झोपायचं याची वेळ निश्चित करा. सुट्टीच्या दिवशीही उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेचं पालन करा. तुमच्या शरीराला याचा चांगला फायदा होईल
रात्री स्क्रिनपासून लांब राहा
रात्री झोपण्याआधी स्क्रिनपासून लांब राहा. टीव्ही पाहू नका. तसेच फोनचाही वापर करू नका. आरामदायी झोपेसाठी झोपण्यापूर्वी एक तास या गोष्टींपासून लांब राहा.
लवकर जेवा, लवकर झोपा
चांगली झोप लागावी यासाठी लवकर जेवा आणि लवकर झोपा. रात्री जड आहार घेणं टाळा . तसेच कॉफी पिऊ नका.
सूर्यप्रकाश घ्या.
सकाळी फिरायला जा किंवा सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी बसा, ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि दिवस चांगला जाईल.
पॉवर नॅप
दुपारी किंवा संध्याकाळी थकवा आल्यास किंवा झोप येतेय असं वाटत असेल तर एक पॉवर नॅप घ्या. यामुळे तुम्हाला पुन्हा काम करण्यासाठी उत्साह येईल.