(Image Credit : IamExpat)
हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा. तसेच पुरेशी झोप न घेतल्याने तुमची चिंता वाढू शकते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कामाचा वाढता ताण आणि पुरेशी चांगली झोप न घेणे यामुळे हाय बीपीने ग्रस्त असलेल्या लोकांचा हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका तीन पटीने अधिक वाढतो.
झोपेने ऊर्जेचे स्तर कायम ठेवण्यास मदत
जर्मनीच्या विश्वविद्यालयात म्यूनिचचे प्रोफेसर आणि रिसर्चचे मुख्य लेखक कार्ल-हेंज लायविग म्हणाले की, 'झोपेमुळे ऊर्जेचा स्तर कायम ठेवण्यास, आराम मिळण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला कामाचा तणाव असेल तर पुरेशा झोपेमुळे तुम्हाला हा तणाव दूर करण्यास मदत मिळू शकते. मात्र दुर्देवाने पुरेशी झोप न घेणे आणि कामाचा तणाव सतत एकत्र होत असतो, आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी हाय बीपीसोबत एकत्र होतात तेव्हा परिणाम अधिक घातक ठरतात'.
हृदयरोगाने मृत्यूचा धोका ३ पटीने वाढतो
या रिसर्चमधून २५ ते ६५ वयोगटातील २ हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यांना हाय बीपीची समस्या तर होती, पण हृदयरोग किंवा डायबिटीस नव्हता. पण तणाव असलेल्या आणि चांगली झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत दोन्हींमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका तीन पटीने अधिक होता.
कामाच्या तणावात अडकणे आणि बाहेर न पडणे धोकादायक
यूरोपिय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित निष्कर्षांवरुन हे समोर आलं आहे की, एकट्या कामाच्या तणावामुळे लोकांमध्ये १.६ टक्के अधिक धोका होता, तर चांगली झोप न घेणाऱ्यांमध्ये हा धोका १.८ टक्के अधिक होता. लायविग म्हणाले की, दबावाच्या स्थितीमध्ये फसल्यावर तुमच्याकडे ही स्थिती बदलण्याची कोणतीही शक्ती नसणे जास्त हानिकारक आहे.