WHO On Omicron: जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार?, WHO नं काय उत्तर दिलं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:55 IST2022-01-24T12:55:00+5:302022-01-24T12:55:32+5:30
Omicron Variant WHO: जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धुमाकूळ सुरू असून आता हा व्हेरिअंट देखील अल्फा, बिटा आणि घातक डेल्टा व्हेरिअंटची जागा घेऊ लागला आहे.

WHO On Omicron: जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार?, WHO नं काय उत्तर दिलं वाचा...
Omicron Variant WHO: जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धुमाकूळ सुरू असून आता हा व्हेरिअंट देखील अल्फा, बिटा आणि घातक डेल्टा व्हेरिअंटची जागा घेऊ लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टेक्निकल लीड टीमनं लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण ओमायक्रॉनचा वेगानं प्रसार होत आहे. 'ओमायक्रॉन व्हेरिअंटचा डेल्टाच्या तुलनेत प्रभाव कमी असला तरी तो आता गंभीर रुप धारण करू शकतो. आपण याआधीच्या स्ट्रेनमध्येही असाच बदल पाहिलेला होता', असं डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड मारिया वान केरखोव यांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉन जर डेल्टाच्या तुलनेत कमी प्रभावी असेल तर याची लागण होणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ का येत आहे आणि मृत्यू का होत आहेत? असा सवाल विचारण्यात आला असता डब्ल्यूएचओनं दिलेलं उत्तर अतिश महत्त्वाचं आहे. 'ज्यांना ओमायक्रॉनची लागण होत आहे. त्यांच्या शरीरात याचे परिणाम दिसत आहेत. कुणात काहीच लक्षणं दिसत नाहीत तर काहींची प्रकृती अतिशय गंभीर होत असल्याचंही दिसून आलं आहे. इतकंच नव्हे तर मृत्यू ओढावत असल्याचंही समोर आलं आहे. ज्यांचं वय अधिक आहे आणि कोरोना लसीचा डोस घेतलेला नाही किंवा सहव्याधी आहे. अशा व्यक्तींना ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर गंभीर स्वरुप धारण करत असल्याचं दिसून आलेलं आहे', असं मारिया वान केरखोव म्हणाले.
जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार का?
जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी याची शक्यता फेटाळली. पण ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचंही ते नमूद करायला विसरले नाहीत. "वेगानं प्रसार होण्याच्या बाबतीत ओमायक्रॉन व्हेरिअंट इतर व्हेरिअंटची जागा नक्कीच घेतोय आणि अतिशय सहजपणे याचा प्रसार लोकांमध्ये होत आहे. जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होत असला तरी सर्वांनाच त्याची लागण होईल असा दावा आपण करू शकत नाही", असं केरखोव म्हणाले.
सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना विरोधी लसी ओमायक्रॉन विरोधात कमी प्रभावी असल्याचं विधान याआधी डब्ल्यूएचओनं केलं होतं. लोकांनी ओमायक्रॉन व्हेरिअंटला हलक्यात घेऊ नये असं आवाहन यावेळी डब्ल्यूएचओनं केलं आहे. महामारीचा शेवट अजून झालेला नाही. त्यामुळे गाफीला राहू नका. ओमायक्रॉनला हलक्यात घेतल्यास मोठं संकट निर्माण होऊ शकतं, असं डब्ल्यूएचओचे अध्यक्ष टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी म्हटलं होतं.