डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:13 IST2022-02-08T12:17:12+5:302022-02-08T13:13:38+5:30
Omicron And Delta : कोरोना डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही व्हेरिएंट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये ओमायक्रॉन किंवा डेल्टाची लागण झाली आहे की नाही, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे.

डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय?
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) कहर केला आहे. कोरोनाच्या एका व्हेरिएंटपासून संक्रमित लोक बरे होत नाहीत, तोपर्यंत दुसरा व्हेरिएंट समोर येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही व्हेरिएंट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये ओमायक्रॉन किंवा डेल्टाची लागण झाली आहे की नाही, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे.
लोक या दोन लक्षणांमध्ये फरक करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे, हे समजण्यात अडचण येत आहे. दरम्यान, ओमायक्रॉनची लक्षणे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा खूपच सौम्य आहेत. अशा परिस्थितीत, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, हे कसे शोधता येईल याबाबत जाणून घेऊया.
ओमायक्रॉन असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत : कोरोना व्हेरिएंटचा प्रभाव व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये वास कमी येण्याचे प्रमाण खूप कमी आढळले आहे. परंतु हे लक्षण इतर व्हेरिएंटमध्ये दिसून येते. याशिवाय फुफ्फुसाचा त्रास आणि ऑक्सिजनची कमतरता यासारखी लक्षणे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिसली नाहीत.
दरम्यान, तुम्हाला कोणत्याही कोरोना व्हेरिएंटची लागण झाली असली तरी अँटीजेन आणि मॉलिक्युलर टेस्ट शरीरात SARs-CoV-2 व्हायरसची उपस्थिती ओळखण्यात मदत करतात. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे पाहण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर (RTPCR) टेस्टचा उपयोग केला जातो. टेस्ट दरम्यान दिलेल्या औषधांच्या मदतीने, त्या व्यक्तीला डेल्टा किंवा ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही हे शोधून काढता येते.