तुम्ही विक्षिप्त आहात? किंवा अधूनमधून करता विक्षिप्तपणा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:30 IST2017-07-25T13:06:04+5:302017-07-25T16:30:24+5:30
..मग तुमच्या आयुष्याची दोरी इतरांपेक्षा अधिक बळकट आहे!..

तुम्ही विक्षिप्त आहात? किंवा अधूनमधून करता विक्षिप्तपणा?
- मयूर पठाडे
काही जण विणाकारण चिडतात, आरडाओरड करतात, चिडचिड करतात, काही जण उगाचंच हसतात, स्वत:शीच बोलतात, काही जण सारखे हात धुतात, कुणी आरशात पाहातात, कुणी शुन्यात बघत बसतात.. असा विक्षिप्तपणा करणारे अनेक जण आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात.. खरं तर विक्षिप्तपणा प्रत्येकाच्याच अंगात असतो, कुणाच्या कमी तर कुणाच्या जास्त..
पण विक्षिप्तपणा जास्त असणारे लोकं जरा चटकून दिसून येतात, काही वेळा ओळखूही येतात इतकंच. पण असे विक्षिप्त लोक जास्त काळ जगतात. त्यांच्या आयुष्याची दोरी जास्त काळ टिकू शकते असं एक निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.
ज्यांच्यात जास्त प्रमाणात विक्षिप्तपणा असतो, अर्थातच त्यांच्यात चिडचिडेपणा, फ्रस्ट्रेशन, नर्व्हसनेस, चिंता, काळजी आणि स्वत:विषयी अपराधभाव.. यासारख्या गोष्टीही त्यांच्यात जास्त प्रमाणात असतात.
अशा विक्षिप्त लोकांमध्ये बºयाचदा स्वत:ची जास्त काळजी घेणं, प्रोटेक्टिव्हनेसपणा जास्त प्रमाणात आढळून येतो. विशेषत: आपल्या तब्येतीच्या बाबतीत. आणि म्हणूनच हे लोक आरोग्याच्याबाबतीत स्वत:ची जास्त काळजी घेतात. कदाचित हेच कारण असावं की अशा व्यक्ती अधिक काळ जगतात, असा अंदाजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
एडिनबर्ग विद्यापीठाच्या मुख्य संशोधक कॅथरीन गेल यांनी यासंदर्भात आपलं निरीक्षण नोंदवताना सांगितलं, विक्षिप्त लोकांमध्ये जास्त जगण्याचं आणि मृत्यू उशीरा येण्याचं प्रमाण अधिक असल्याचं आम्हाला आढळून आलं आहे. सगळ्याच प्रकारचे आजार, अगदी कॅन्सरसारख्या अजारांनाही हे लोक कमी प्रमाणात बळी पडतात.
या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल पाच लाखापेक्षाही अधिक लोकांची चाचणी घेतली. ३७ ते ७३ या वयोगटातील हे सारे लोक होते.
याशिवाय या अभ्यासात सामील झालेल्या साºया लोकांच्या आरोग्यविषयक सवयीसंदर्भातही माहिती गोळा करण्यात आली. त्यांची फिजिकल अॅक्टिव्हिटी काय आहे, व्यायाम वगैरे करतात का, धुम्रपानाची सवय आहे का, त्यांचं ब्लड प्रेशर, बॉडी मास इंडेक्स, आकलन क्षमता, कॅन्सर, डायबेटिस, हृदयविकार.. यासारखे काही आजार त्यांना आहेत का याविषयीही सारा डेटा गोळा करण्यात आला आणि त्यानंतर यासंदर्भातला निष्कर्ष काढण्यात आला.