Monsoon Special : या घरगुती उपायांनी मिळवा सततच्या सर्दी आणि खोकल्यापासून सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:23 IST2018-06-27T15:23:20+5:302018-06-27T15:23:24+5:30
अशात वेगवेगळी औषधे घेतली तर त्याचेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवू शकता.

Monsoon Special : या घरगुती उपायांनी मिळवा सततच्या सर्दी आणि खोकल्यापासून सुटका!
पावसाळा सुरु झाला की, सर्दी आणि खोकल्याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यावर वेगवेगळे उपायही केले जातात. पण पुन्हा हा त्रास डोकं वर काढतो. अशात वेगवेगळी औषधे घेतली तर त्याचेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवू शकता.
लसूण
1) जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो. अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
2) लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .
हळद
1) घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.
2) हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.
3) चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
आयुर्वेदिक काढा
हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा, आलं, लवंग, काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.
1) चार वेलची, काळामिरीचे दाणे, लवंगा, ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर 10 -15 मिनिटे उकळा. उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा. त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.
2) 10-15 तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा. दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा. यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
3) कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात 2-3 कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.