मंकीपॉक्स किंवा कोरोना नाही...; भारतातील लोकांना वाटते 'या' आजाराची भीती, सर्व्हेत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:26 IST2024-08-20T11:26:10+5:302024-08-20T11:26:50+5:30
मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता, WHO ने ग्लोबल हेल्थ इमर्जेन्सी घोषित केली आहे. भारताचं आरोग्य मंत्रालयही याबाबत सतर्क आहे, पण देशातील जनतेला त्याची फारशी चिंता वाटत नाही.

मंकीपॉक्स किंवा कोरोना नाही...; भारतातील लोकांना वाटते 'या' आजाराची भीती, सर्व्हेत मोठा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये आढळून आलेल्या मंकीपॉक्सच्या प्रकरणांमुळे विविध देशांतील सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता, WHO ने ग्लोबल हेल्थ इमर्जेन्सी घोषित केली आहे. भारताचं आरोग्य मंत्रालयही याबाबत सतर्क आहे, पण देशातील जनतेला त्याची फारशी चिंता वाटत नाही.
लोकल सर्कल्सकडून सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये मंकीपॉक्स, कोविड आणि इतर व्हायरल आजारांबाबत भारतातील लोक किती गंभीर आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वेक्षणात लोकल सर्कल्सनी देशातील ३४२ जिल्ह्यांमध्ये जाऊन दहा हजारांहून अधिक लोकांशी चर्चा केली. यापैकी केवळ ६% लोकांनी सांगितलं की ते मंकीपॉक्सबद्दल चिंतित आहेत. या लोकांमध्ये, जास्तीत जास्त २९% लोकांनी व्हायरल आजारांबद्दल चिंता व्यक्त केली.
सर्वेक्षणाचा असा होता निकाल
१३% लोक कोरोनामुळे चिंतित
६% लोक मंकीपॉक्समुळे काळजीत
२९% यातील कशाचीच चिंता वाटत नाही
२९% इतर व्हायरल इन्फेक्शनला घाबरतात
23% लोकांनी सांगू शकत नसल्याचं सांगितलं
जगात मंकीपॉक्सची प्रकरणं सातत्याने वाढत आहेत. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे कारण शेजारी देश पाकिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकारे, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये या आजाराच्या एकूण चार केस आढळून आल्या आहेत.
केंद्राने जारी केला अलर्ट
वाढत्या धोक्यांदरम्यान केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व विमानतळांच्या तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील अधिकाऱ्यांना 'मंकीपॉक्स'मुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने दिल्लीतील तीन मध्यवर्ती रुग्णालये (राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालय) हे मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या कोणत्याही रुग्णाचं आयसोलेशन, व्यवस्थापन आणि उपचारांसाठी नोडल केंद्रे म्हणून निश्चित केली आहेत.