CoronaVirus News: फायझर पाठोपाठ मॉडर्नाकडून गुड न्यूज; कोरोनावरील लस ९४.५% प्रभावी
By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 21:48 IST2020-11-16T21:45:17+5:302020-11-16T21:48:33+5:30
कोरोना संकटात सापडलेल्या अमेरिकेतून जगासाठी दोन दिलादायक बातम्या

CoronaVirus News: फायझर पाठोपाठ मॉडर्नाकडून गुड न्यूज; कोरोनावरील लस ९४.५% प्रभावी
मुंबई: जगातील कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. भारतात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरीही अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अमेरिकेत दिवसाकाठी कोरोनाचे सव्वा ते दीड लाख रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मॉडर्ना कंपनीनं दिलासादायक माहिती दिली आहे. मॉडर्ना कंपनीनं तयार केलेली कोरोनावरील लस ९४.५ टक्के यशस्वी ठरली आहे.
मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील सुरुवातीचे निष्कर्ष हाती आले आहेत. कोरोनावरील लस ९४.५ टक्के यशस्वी ठरल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. गेल्या आठवड्यात फायझरनं कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी ठरल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मॉडर्ना कंपनी ९४.५ टक्के प्रभावी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.
बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला ५० ते ६० टक्के प्रभावी ठरतात. मात्र फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आहेत. मात्र कोरोना लसीचं वितरण सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळाल्यानंतरच नियामकांकडून लसींना मंजुरी मिळते. नियामकांनी लवकर परवानगी दिल्यास डिसेंबरपासून अमेरिकेत दोन्ही लसींचा आपत्कालीन वापर सुरू होईल.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लसीच्या ६ कोटींचे डोस उपलब्ध होऊ शकतात. पुढील वर्षी या दोन लसींचे १०० कोटी डोस निर्माण करण्याचा कंपन्यांचा मानस आहे. हे डोस अमेरिकेसाठी वापरण्यात येतील. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ३३ कोटी इतकी आहे. त्यामुळे १०० कोटी डोस अमेरिकेच्या गरजेपेक्षा अधिक असतील.