आपल्याला कायम फिट आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर आपण योग्य आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि नियमित व्यायाम करणं खूप महत्वाचं असतं. हल्ली बरेच लोक घरी काम करतात म्हणजेच वर्क फ्रॉम होम करतात. काहीवेळा अशा लोकांची जीवनशैली खूपच निवांत आणि आळशीदेखील होते. तर काही लोक बाहेर जाऊन काम करतात. मात्र ते कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट करत नाहीत. अशाप्रकारे व्यायाम किंवा शारिक कष्ट न करणारे लोक आळशी होतात.
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने एक नवीन अहवाल सादर केला आहे. यामध्ये असे म्हणलेले आहे की, हल्ली लोकांच्या आळशीपणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. दरवर्षी जगातील 8 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू त्यांच्या आळशीपणामुळे होतो. WHO च्या मते, लोकांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम किंवा 75 मिनिटे हेवी वर्कआउट करायला हवे. असे न केल्यास ते लोक आळशी मानले जातातआणि शारीरिक हालचालींचा अभाव त्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकते.
हल्ली लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. चुकीच्यावेळी खाणे-झोपणे, चुकीचा आहार घेणं, व्यायाम न करणे अशा जीवनशैलीमुळे भारतातील 66% लोकांचा मृत्यू होतो. यामुळे दरवर्षी 60 लाख 46 हजार 960 लोकांना गंभीर आजार होतात आणि यामुळेच त्यांचा मृत्यू होतो. मुख्य म्हणजे अशा पद्धतीने जीव गमावलेल्या एकूण लोकांपैकी 54% लोकांचे वय 70 वर्षांपेक्षा कमी आहे.
तसेच दरवर्षी भारतात 28% लोकांचा मृत्यू हृदयविकाराने, 12% श्वासोच्छवासाच्या आजारांमुळे, 10% कर्करोगाने, 4% मधुमेहामुळे आणि उर्वरित 12% लोकांना वाईट जीवनशैलीमुळे जीव गमवावा लागतो. भारतात दारू पिणाऱ्या लोकांची संख्यादेखील दिवसागणिक वाढते. तसेच अनेक लोक तंबाखूचे सेवन जास्त प्रमाणात करतात आणि यामुळे कर्करोगासारखे आजार होतात.