वॉशिंग्टन : रात्री उशिरा झोपल्याने किंवा असुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवसाची ऊर्जा तर कमी होतेच, पण दीर्घकाळ झोप न लागल्यामुळे (क्रॉनिक इन्सोम्निया) मेंदूत असे काही बदल घडतात की ज्यामुळे भविष्यात स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका निर्माण होतो, असे एका अमेरिकन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेतील मेयो क्लिनिक येथील संशोधकांनी ५० वर्षांवरील २,७५० व्यक्तींचा सरासरी साडेपाच वर्षे अभ्यास केला. दरवर्षी त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. अनेकांचा मेंदू स्कॅन करण्यात आला. या स्कॅनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींची नोंद झाली. एक मेंदूत साचणारे अमायलॉइड प्लॅक्स व दुसरे व्हाईट मॅटर हायपरइंटेन्सिटीस म्हणून ओळखली जाणारी सूक्ष्म हानी.
प्रतिबंधक उपाय लवकर सुरू करणे मेयो क्लिनिकच्या अभ्यासातील स्वयंसेवकांचे सरासरी वय सुरुवातीला ७० होते. पण इतर संशोधनांनी दाखविले आहे की, ५०व्या वर्षांमध्ये रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना पुढे डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. म्हणूनच, निवृत्तीची वाट पाहण्याऐवजी मध्यमवयापासूनच झोपेसह रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व व्यायामाकडे लक्ष देणे हे शहाणपणाचे ठरते.
दुहेरी धोका का जाणवतो?अल्झायमर केवळ अमायलॉइडमुळे होत नाही, तर सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या गळती किंवा अडथळ्यांमुळेही हानी वेगाने वाढते. अमायलॉइड न्युरॉन्सचे कार्य बिघडविते, तर व्हाईट मॅटर हानी मेंदूतील भागांमध्ये संदेशवहन विस्कळीत करते. त्यामुळे निद्रानाश असलेल्यांमध्ये दोन्ही एकत्र दिसल्यास धोका दुप्पट होतो. झोप आणि मेंदू आरोग्याचा घनिष्ठ संबंध - संशोधकमध्यमवयीन काळात व त्यानंतरची झोप मेंदूच्या कार्यक्षमतेशी थेट निगडित आहे. निद्रानाशामुळे रक्तदाब व रक्तातील साखरही वाढण्याची शक्यता असते, असे युके, चीन आणि अमेरिका येथे झालेल्या इतर अभ्यासांत आढळले आहे.
स्मरणशक्ती वेगाने ढासळली सामान्य झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत निद्रानाश असलेल्यांची स्मरणशक्ती व विचारशक्ती अधिक वेगाने घटली. या गटात डिमेन्शिया होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी जास्त होती. विशेष म्हणजे, कमी झोप घेणारे निद्रानाश ग्रस्त सुरुवातीपासूनच वयापेक्षा ४ ते ५ वर्षांनी वयस्क दिसतात.