भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:16 IST2025-08-02T10:15:27+5:302025-08-02T10:16:15+5:30
या ऑपरेशननंतर श्री एका तासातच बरी झाली. तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर ३ ते ५ दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला.

भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
पुणे - नहमी इथून तिथे पळणारी 'श्री' अचानक शांत झाली, तिने जेवण बंद केले. घरचेही तिच्याकडे पाहून अस्वस्थ झाले. ही गोष्ट आहे तळेगावजवळील सोमाटणे येथील नामदेव यांच्याकडील श्री या मादी कासवाची...कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याचं दिसून आले. तिला प्रचंड अस्वस्थ वाटत होते. अंडी बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करत होती परंतु तिला वेदना सहन होत नव्हत्या. मागील १-२ महिन्यापासून श्री नावाची मादी कासव आरोग्याशी संघर्ष करत होती. त्यावेळी तिच्या घरच्यांनी पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये तिला दाखवले. याठिकाणी डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करून दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. या ऑपरेशनमुळे श्री ला नवे जीवदान मिळाले आहे.
याबाबत पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की, क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत चार पूर्णत: तयार झालेली अंडी बाहेर काढल्याने कासवाला वाचवता आले. कासवाला जेव्हा त्याच्या पालकांनी आणले, तेव्हा त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तिला ‘एग बाऊडींग’ चा त्रास असल्याचे लक्षात आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत. अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील दिसून आली. रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. एपिडोसिन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले. श्रीने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले. तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते. जे शस्त्रक्रियेपूर्वीचे सकारात्मक लक्षण होते. मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे लिहून देण्यात आली.
त्यानंतर श्रीची शस्त्रक्रिया २१ जुलै २०२५ रोजी लॅप्रोस्कोपिक पध्दतीचा वापर करुन केली जाणार होती. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिला आरामदायी राहण्यासाठी काळजीपूर्वक इंट्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली. तिचे वजन १.५ किलो होते. बीपी डॉप्लर आणि एसपीओ २ सेन्सर वापरून तिच्या जीवनावश्यक अवयवांचे निरीक्षण करण्यात आले. तिला उबदार ठेवण्यासाठी अंगाखाली एक हीटिंग पॅड ठेवण्यात आलं. शस्त्रक्रियेत तिच्या गर्भाशयाच्या उजव्या पायाजवळ एका लहान छिद्र पाडून फॅलोपियन ट्यूब अंडाशयापर्यंत नेली आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली. त्यानंतर अंडाशय देखील काढून टाकण्यात आले. या ऑपरेशननंतर श्री एका तासातच बरी झाली. तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर ३ ते ५ दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान, अशा परिस्थितीत अंडी काढण्यासाठी कवच कापावे लागते मात्र या प्रकरणात डॅाक्टरांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया केल्याने कवच वाचविता आले. त्यामुळे संसर्गाचा धोका टळला. ही भारतातील पहिली लॅपरोस्कोपिक एग-बाउंड शस्त्रक्रिया आहे. जिथे सेव्होफ्लुरेन गॅस ऍनेस्थेसियासह GE 620 केअरस्टेशनचे यांत्रिक व्हेंटिलेशन वापरले गेले. श्री च्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. ती आधीसारखी उत्साही वाटत आहे असं डॉक्टरांनी सांगितले.