हिपॅटॅटिस. या जीवघेण्या आजाराशी या भाज्या करू शकतात दोन हात. मग त्यांचा समावेश रोजच्या जेवणात कराच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 18:57 IST2017-07-28T18:46:59+5:302017-07-28T18:57:30+5:30
हिपॅटॅटिसला विरोध करणार्या, त्याला काबूत ठेवू शकणार्या अनेक भाज्या आहेत ज्याचा समावेश आपण अगदी सहजपणे आपल्या रोजच्या आहारात करू शकतो.

हिपॅटॅटिस. या जीवघेण्या आजाराशी या भाज्या करू शकतात दोन हात. मग त्यांचा समावेश रोजच्या जेवणात कराच!
- माधुरी पेठकर
हिपॅटॅटिस अर्थात यकृत दाह. हा जीवघेणा आजार आहे. यकृताला विषाणूंचा संसर्ग होवून हा आजार होतो. हा काही फक्त भारतात आढळणारा आजार नसून या आजारानं जगभरात धुडगूस घातला आहे. त्यामुळेच 28 जुलै हा ‘वर्ल्ड हिपॅटॅटिस डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या आजाराची लागण होवू नये म्हणून आहारापासून औषधापर्यंत, उपायापासून काळजी घेण्यापर्यंत ज्या गोष्टी करता येतील त्यासंबंधीच्या माहितीचा प्रचार आज जगभरातून केला जात आहे. उद्देश हाच की या जीवघेण्या आजारापासून प्रत्येकाचं रक्षण व्हावं.
हा आजार आपल्यापासून दहा हात दूर राहावा यासाठीची काळजी आपण आपल्या आहारातूनही घेवू शकतो. हिपॅटॅटिसला विरोध करणार्या, त्याला काबूत ठेवू शकणार्या अनेक भाज्या आहेत ज्याचा समावेश आपण अगदी सहजपणे आपल्या रोजच्या आहारात करू शकतो.
या भाज्या नियमित खा
1) गाजर- गाजरात मोठ्या प्रमाणात ग्लुटाथिआॅन नावाचं प्रथिनं असतं. त्याचप्रमाणे गाजरात मोठ्या प्रमाणात बिटा केरोटिन आणि प्लान्ट फ्लेव्होनिडस नावाचे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे गाजराचा समावेश रोजच्या आहारात केला तर यकृताचं कार्य व्यवस्थित चालू राहातं.
2 ) टमाटे- टमाट्यात ग्लुटाथिआॅन सोबतच अॅण्टिआॅक्सिडंटही मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक यकृत स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात टमाटा असणंही आवश्यक आहे.
3) बीट- गाजराप्रमाणे बीटामध्येही प्लान्ट फ्लेव्होनिडस, बिटा केरोटिन हे घटक असतात. यकृताचं काम योग्य प्रकारे चालण्यास बीट मदत करतं. बीट शिजवून खाण्यापेक्षा कच्चं खाणं किंवा रस स्वरूपात सेवन करणं यकृतासाठी उपयुक्त असतं.
4) पालक- पालक म्हणजे शरीराची स्वच्छता दूतच. पालकात क्लोरोफिल नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील विषारी घटक शोषून घ्यायला मदत करतो. पालकाच्या सेवनानं पित्त यकृतात साठून राहात नाही. पालकमुळे यकृतातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात.
5) लसूण- लसणासारख्या उग्र घटकामध्ये एन्झाइम्स असतात. लसणामध्ये अॅलिसिन आणि सेलेनियम हे घटक आहेत जे बांधांच काम करतात. हे घटक यकृताचं विषारी घटकांपासून संरक्षण करतं. लसूण स्वयंपाकात शिजवून खाता येतो तसाच कच्चाही खाता येतो. लसूण कोलेस्टेरॉल कमी करतो.
6) ब्रोकोली- ही भाजी वरचेवर आहारात असणं गरजेचं आहे. ब्रोकोली ग्लुकोसिनोलेट या नैसर्गिक घटकाची निर्मिती शरीरात करतं. या घटकामुळे यकृतातील कार्सिनोजन्ससारखे विषारी घटक शरीराबाहेर पडतात.
या भाज्या नियमित आहारात घेतल्या तरी आपण आपल्या पातळीवर हिपॅटॅटिस सारख्या जीवघेण्या आजाराचा बंदोबस्त करू शकतो.