HEALTH ALERT :...यानंतर कलिंगड खाल्ले तर आरोग्याला बाधक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:05 IST2017-03-21T12:35:57+5:302017-03-21T18:05:57+5:30
संशोधनानुसार कलिंगड कधी खावे, कधी खाऊ नये, याचेही काही नियम आहेत. असे केले नाही तर कलिंगड खाणे महागात पडू शकते.

HEALTH ALERT :...यानंतर कलिंगड खाल्ले तर आरोग्याला बाधक !
उन्हाळ्याची चाहूल लागली असून शहराच्या बाजारपेठेत लालगर्द कलिंगडाचे आगमन झाले आहे. कलिंगडामध्ये शीतल गुणधर्म असल्याने ते खाण्याचा मोह लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणालाच आवरता येत नाही. उन्हाळ्यात कलिंगड खाणे तसे आरोग्यदायी मानले जाते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी म्हणजेच शरीराच्या आतपर्यंत शरीरकोषांमधलीही उष्णता कमी करण्यास उपयोगी पडणारे फळ म्हणजे कलिंगड. मात्र एका संशोधनानुसार कलिंगड कधी खावे, कधी खाऊ नये, याचेही काही नियम आहेत. असे केले नाही तर कलिंगड खाणे महागात पडू शकते.
शरीराला गारवा मिळण्यासाठी बरेचजण कलिंगडाचा रसदेखील पितात. यामुळे उन्हाळ्यात होणारा गरम लघवीचा त्रास, अंगावर उठणाऱ्या उष्णतेच्या पुटकुळ्या, वगैरे तक्रारी लवकर दूर होतात. शिवाय कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम हे खनिज असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य करते. तसेच कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचे एक बायोफ़्लेनेवॉईड असते. लायकोपेन हे एक अतिशय उत्तम अॅन्टिआॅक्सिडन्ट आहे, जे रक्तामध्ये वाढलेल्या घातक फ्री-रॅडिकल्सना कमी करुन कॅन्सरचा धोका कमी करते. ज्यांच्या शरीरामध्ये लायकोपेनचे प्रमाण व्यवस्थित असते, अशा स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो, असे सुप्रसिद्ध हार्वर्ड संस्थेच्या संशोधकांचे मत आहे. तेव्हा उन्हाळ्याचा ताप कमी करण्यासाठी म्हणून कलिंगडाचे सेवन करा आणि घातक आजारांपासूनसुद्धा स्वत:ला वाचवा.
कलिंगड बाहेरुन कितीही स्वच्छ दिसत असले तरी ते कापण्यापूर्वी स्वच्छ धुवावे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलिंगड कापल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांमध्ये खावे. त्यानंतर खाल्लेले कलिंगड आरोग्याला बाधक होऊ शकते. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.