सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना ‘फुल्ल स्पीड’
By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-13T00:07:35+5:302014-09-13T00:10:19+5:30
आज गडकरी सांगलीत : अजितराव घोरपडे, डोंगरेंचा भाजप प्रवेश,

सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना ‘फुल्ल स्पीड’
आज गडकरी सांगलीत : अजितराव घोरपडे, डोंगरेंचा भाजप प्रवेश, पृथ्वीराज देशमुख भिलवडीत गडकरींना भेटणार
सांगली : आचारसंहिता जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघा महिना राहिल्याने वातावरण गरम होऊ लागले आहे. त्यातच केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या, शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांचा भाजपप्रवेश होणार आहे. दरम्यान, सायंकाळी आचारसंहिता लागू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील वाहने प्रशासनाने जमा करण्यास सुरुवात केली, शिवाय प्रचार होणारे फलक उतरवण्यास गती आली.
यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आज सायंकाळी आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील वाहने प्रशासनाने जमा करण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाल २१ सप्टेंबरला संपणार होता. परंतु, त्यापूर्वीच नऊ दिवस आधी आचारसंहिता लागल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना गाड्या जमा करून कामकाज थांबवावे लागले. महापालिकेच्या सुमारे ४५ कोटींच्या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी वाहने व मोबाईल सीमकार्ड प्रशासनाकडे जमा केली. सायंकाळनंतर महापालिका प्रशासनाच्यावतीने डिजिटल हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून, पन्नासहून अधिक फलक काढण्यात आले. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्वागतकमानी उतरवण्यास सुरुवात झाली. जिल्हाभरात सर्वत्र आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेही येणार असून, कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांचा भाजपप्रवेश त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातूनच भाजपच्या प्रचारतोफांना बत्ती दिली जाणार आहे. सकाळी गडकरी कोल्हापूरहून आष्ट्यामार्गे येताना भिलवडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची भेट घेणार आहेत. देशमुख पलूस-कडेगाव मतदारसंघातून इच्छुक असून, या भेटीत महायुतीतील त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. कवठेमहांकाळच्या कार्यक्रमानंतर गडकरी मिरजेतील कुपवाड रस्त्यावरील फार्महाऊसवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.