जिम जाणाऱ्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, जिमला जाण्याआधी काही खावं किंवा खाऊ नये? सगळ्यांनाच शरीराला पोषण आणि वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळावी असं वाटत असतं. पण अनेकदा चुकून अशा काही गोष्टी खाल्ल्या जातात की, त्याचा आपण आजारी पडू शकतो किंवा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असते.
अनेकांना हे माहीत असतं की, जिमला जाण्याआधी काय खावं, पण अनेकांना हे माहीत नसतं की, जिमला जाण्याआधी काय खाऊ नये. तर आज आम्ही तुम्हाला जिमला जाण्याआधी काय खाऊ नये हे सांगणार आहोत.
दूध आणि दुधापासून तयार पदार्थ
वर्कआउट करण्याआधी दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ जसे की, दही आणि लस्सी इत्यादींपासून दूर रहावे. दूध हे कॅल्शिअमचं मोठं स्त्रोत आहे. पण दुधात लॅक्टोजही असतं. त्यामुळे वर्कआउटआधी दुधाचं सेवन केल्याने आतड्यांना नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ वर्कआउट करण्यापूर्वी सेवन करू नये.
तळलेले-भाजलेले पदार्थ
जिममध्ये जाण्याआधी तळलेले किंवा भाजलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यांमध्ये अतिरिक्त फॅट असतात जे आतड्यांवर दबाव टाकतात. याने तुम्हाला डायरिया, पचनाची समस्या आणि आतड्यांसंबंधी समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे वर्कआउटआधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.
फ्लॉवर
फ्लॉवर किंवा ब्रोकलीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, पण यात सल्फरही असतं. ज्यामुळे काही लोकांना गॅसची समस्या होत असते. त्यामुळे वर्कआउटआधी फ्लॉवर किंवा ब्रोकलीचं सेवन करू नका.
सोडा
जिममध्ये जाण्याआधी सोडा किंवा त्यापासून तयार पदार्थांचं सेवन करणे टाळावे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. सोड्यामुळे गॅसची समस्या होते. याने तुम्हाला वर्कआउट करताना अडचण येऊ शकते.
गोड पदार्थ टाळा
जिमला जाण्याआधी गोड पदार्थ खाणेही टाळावे. कारण यात असलेल्या एक्स्ट्रा शुगर, फॅट आणि बटरमुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला वर्कआउट करताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वर्कआउटआधी कधीही गोड पदार्थ खाऊ नये.