स्वच्छतेची खूप काळजी घेता, मग तुमच्या बाळात जन्मजात दोष आढळतील..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:25 IST2017-07-28T17:23:13+5:302017-07-28T17:25:06+5:30
पर्सनल हायजिन, घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही शाम्पू, कंडिशनर्स, डिटर्जन्ट्स हॅण्ड वॉश.. वापरता? - बाप रे!

स्वच्छतेची खूप काळजी घेता, मग तुमच्या बाळात जन्मजात दोष आढळतील..
- मयूर पठाडे
स्वच्छतेची आवड कोणाला नसते? त्यातही घरातल्या गृहिणी तर कायम स्वच्छतेच्याच मागे लागलेल्या असतात, मग ती घराची स्वच्छता असो, नाहीतर शरीराची. त्यापासून काही विकार होऊ नयेत, यासाठी ही दक्षता आवश्यकही आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर? त्याचा परिणाम तुमच्या होणाºया बाळावर होऊ शकतो आणि त्याच्यात काही जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.
स्वत:च्या शरीराच्या आणि घराच्या स्वच्छतेसाठी आपण रोज घरात काय काय वापरतो?
शाम्पू, कंडिशनर्स, डिटर्जन्ट्स, पर्सनल हायजिन, कीटकनाशकांसाठी वेगवेगळे क्लिनर्स, हॅँड वॉश, फूड प्रिझरवेटिव्हज, लॉँड्री प्रॉडक्ट्स, आय ड्रॉप्स, याशिवाय इतरही अनेक पर्सनल केअर प्रॉडक्ट्स.. इतकंच नाही, अनेक जण पोहोण्यासाठी म्हणून स्विमिंग पूलवर जातात, तिथेही पाण्याच्या स्वच्छतेसाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो..
पण या साºयाचा आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे?
अमेरिकेतली व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात अलीकडेच एक मोठं संशोधन केलं. त्यातून त्यांच्या हाती आलेले निष्कर्ष आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत.
संशोधकांनी हे सारे प्रयोग मुख्यत: केले ते उंदरांवर. जे जे उंदिर या साºयाच्या संपर्कात आले, त्यांच्या पुढच्या पिढीत जन्मजात दोष आढळून आले. शास्त्रज्ञांचं तर असंही निरीक्षण आहे, की हे पदार्थ त्यांच्या शरीरात जाणं किंवा त्यांनी त्याचं सेवन करणं, या गोष्टी तर खूप दूर, ज्या घरात, ज्या रुममध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात आहेत, त्याच्या नुसत्या संपर्कानंही त्यांच्या पुढच्या पिढीत हे जन्मजात दोष दिसून आले.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या केमिकल डिटर्जन्ट्सच्या संपर्कामुळे जे दुष्परिणाम उंदरांवर दिसून आले, तसेच परिणाम माणसावरही होऊ शकतात. माणसं तर त्याच्या आणखी जास्त संपर्कात असतात.
घरात पती आणि पत्नी या दोघांपैकी कोणता जोडीदार या डिटर्जन्ट्सच्या जास्त संपर्कात येतो, की दोन्ही जण येतात यावरही तुमच्या बाळात किती जन्मजात दोष असू शकतील हे अवलंबून असतं.
त्यामुळे संशोधकांचं म्हणणं आहे, घराची आणि वैयक्तिक स्वच्छता तर प्रत्येकानं ठेवलीच पाहिजे, त्याला काहीच पर्याय नाही, नाहीतर अनारोग्याला आमंत्रण मिळेल, पण हे करीत असताना तुम्ही काय आणि कसला उपयोग करता, हेदेखील तपासून पाहा. केमिकल्स आणि डिटर्जन्ट्सचा अतिरेकी वापर टाळा आणि आपल्या बाळालाही त्यापासून वाचवा. आपली भावी पिढी जर आपल्याला सशक्त हवी असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील...