सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूरःअभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी अचानक निधन झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तपासात शेफाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे अॅटी-एजिंग औषधांचे सेवन करत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या औषधांविषयी चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अँटी-एजिंग औषधांचे सेवन करण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे आणि संभाव्य धोके समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या औषधांपेक्षा निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताणमुक्त जीवन हेच दीर्घायुष्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहेत.
आजच्या आधुनिक जगात तरुण आणि सुंदर दिसण्याचा मोह अनेकांना असतो. वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेचा सैलपणा कमी करण्यासाठी अनेक जण विविध अँटी-एजिंग औषधे आणि उपचारांचा अवलंब करत आहेत. सेलिब्रिटींच्या वापरामुळे याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्वचेची चमक, कमी सुरकुत्या आणि सुडौल शरीरयष्टी मिळवण्यासाठी अनेक जण इंटरनेट पाहून स्वतःहून या औषधांचा वापर करतात. परिणामी, दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संभाव्य धोके जाणून घ्या : डॉ. मुखीडॉ. जयेश मुखी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. जयेश मुखी यांनी सांगितले, जर योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा अयोग्य पद्धतीने अँटी-एजिंग औषधे आणि उपचार घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यात त्वचेवर पुरळ, खाज सुटणे किंवा सूज येऊ शकते. इंजेक्शन्सच्या ठिकाणी संक्रमण होण्याचा धोका होऊ शकतो. काही अँटी-एजिंग हार्मोन्स किंवा सप्लिमेंट्सचा हृदयावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कार्डियाक अरेस्टसारख्या गंभीर घटना घडू शकतात. काही औषधांमुळे यकृत आणि किडनीवर ताण येऊ शकतो. हार्मोन थेरपी चुकीच्या पद्धतीने घेतल्यास शरीरातील नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडू शकते. काही औषधी दीर्घकाळ वापरल्यास कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांचा थोका वाढू शकतो. त्यामुळे या औषधांचा वापर योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे अत्यंत आवश्यक आहे.
नैसर्गिकरीत्या निरोगी राहा : डॉ. जोशीअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक व ज्येष्ठ औषधवैद्यक शास्त्राचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले, फक्त तरुण दिसण्याच्या मोहात अडकून अँटी-एजिंगसारख्या औषधी घेऊन आरोग्याशी खेळू नका. नैसर्गिकरीत्या निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या. यात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा, नियमित व्यायाम करा, सलग सात ते आठ तासांची झोप घ्या आणि तणावाचे व्यवस्थापन करा, हीच खरी अँटी-एजिंग थेरपी आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या मंजूर नाही : डॉ. तायडेएंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. परिमल तायडे यांनी सांगितले, तरुण आणि सुंदर दिसण्याच्या इच्छेने अनेक जण अँटी-एजिंग उत्पादने आणि उपचारांकडे वळत असले तरी, ही औषधे वैज्ञानिकदृष्ट्या 'पूर्णतः मंजूर' नाहीत. 'वृद्धत्वाची प्रक्रिया पूर्णपणे थांबवणे किंवा उलट करणे असा दावा करणारी अनेक उत्पादने आणि उपचार पद्धती बाजारात उपलब्ध असल्या तरी, त्यांना अजूनही ठोस वैज्ञानिक आधार नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे दावा करणाऱ्यांपासून सावध रहा. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम हेच दीर्घायुष्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी प्रभावी आहेत.