Plasma Therapy: प्लाझ्मा थेरपी फसली का? कोरोनावरील उपचार पद्धतीच्या यादीतून गच्छंती, जाणून घ्या कशामुळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 07:19 IST2021-05-19T07:19:10+5:302021-05-19T07:19:25+5:30
कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातून रक्त घेतले जाते. रक्तातून पिवळा द्रव बाजूला काढला जातो. तो कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या शरीरात संक्रमित केला जातो.

Plasma Therapy: प्लाझ्मा थेरपी फसली का? कोरोनावरील उपचार पद्धतीच्या यादीतून गच्छंती, जाणून घ्या कशामुळे?
कोरोनावरील खात्रीलायक उपचार म्हणून आतापर्यंत प्लाझ्मा थेरपीला (रक्तद्रव उपचार) बहुमान होता. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मागणी होती. त्यांच्याकडूनच प्लाझ्मा मिळत होते; मात्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी या थेरपीला कोरोनावरील उपचार पद्धतीच्या यादीतून काढून टाकले आहे. जाणून घ्या या थेरपीबद्दल आणि ही थेरपी कोरोना उपचारातून बाद करण्याच्या कारणांबद्दल...
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातून रक्त घेतले जाते. रक्तातून पिवळा द्रव बाजूला काढला जातो. तो कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या शरीरात संक्रमित केला जातो. या सर्व प्रक्रियेला प्लाझ्मा थेरपी असे संबोधले जाते. ज्या व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे त्याच्या शरीरात अँटिबॉडी (प्रतिपिंडे) तयार झालेले असतात आणि ही प्रतिपिंडे कोरोनावर उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित केल्यास त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होते.
प्लाझ्मा संदर्भातील मतमतांतरे
ब्रिटनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘द लॅन्सेट’ या मासिकात अलीकडेच प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत नाही. प्लाझ्मा थेरपी ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून, खर्चिक असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. चीन आणि नेदरलँडमधील तज्ज्ञांच्या गटाने प्लाझ्मा थेरपीवर फुली मारली आहे. उपचार पद्धती जीवरक्षक नसल्याचे अमेरिकी तज्ज्ञांनीही म्हटले आहे.आयसीएमआरने गंभीर कोरोना रुग्णांवर ही थेरपी उपयुक्त ठरत नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते.
मृत्यूंचे प्रमाण कमी करू शकते का?
वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आणीबाणीच्या परिस्थितीतच या उपचार पद्धतीचा उपयोग केला जात आहे.कोरोनामुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या पहिल्या टप्प्यातच प्लाझ्मा थेरपी दिली गेल्यास रुग्णाला आराम पडू शकतो, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.