तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 07:07 IST2025-09-14T07:07:07+5:302025-09-14T07:07:41+5:30
शौचालयात कमोडवर बसून अनेकजण दीर्घकाळ मोबाइलवर स्क्रोलिंग करत असल्याने मूळव्याध होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टॉयलेट सीटवर दीर्घकाळ बसल्याने गुदाशयावरील दाब वाढतो व रक्तवाहिन्या फुगतात.

तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
डॉ. अमोल वाघ
सहयोगी प्राध्यापक, सर जे.जे. रुग्णालय
मो बाइलचा अतिरेकी वापर अनेक त्रासांना कारणीभूत ठरतो, याची जाणीव एव्हाना सगळ्यांनाच झाली आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि दृष्टिदोष वाढतो. झोपेचा त्रास, मानेत व पाठीत वेदना, आणि मानसिक तणाव निर्माण होतात. लहान मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि एकाग्रता कमी होते. सतत सोशल मीडियावर राहिल्यामुळे मोबाइल व्यसनाधीनता वाढते. यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या कित्येक घटना तुमच्या वाचनात आल्या असतीलच. याबद्दल समाजात जनजागृती होत आहे. मात्र, काही लोक घरात शौचालयाला जाताना मोबाइल सोबत घेऊन जात असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून मूळव्याधीचा (पाइल्सचा) धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
शौचालयात बसल्यावर मोबाइल फोन वापरणाऱ्या व्यक्तींना मूळव्याध (गुदाशय भागातील सूज व रक्तवाहिन्यांमध्ये दाह) होण्याचा धोका तब्बल ४६% ने जास्त असतो, असे एका नव्या अभ्यासातून देखील स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास 'प्लस वन' वैद्यकीय संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला. हार्वर्ड मेडिकल स्कूलशी संलग्न मेडिकल सेंटरवर पुरुष व महिलांवर हा सर्वेक्षणात्मक अभ्यास करण्यात आला. तसेच भारतातसुद्धा अनेक वैद्यकीय संस्थांत यावर संशोधन निबंध सादर करण्यात आले आहेत. भारतात मूळव्याधीचा प्रादुर्भाव अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत आहे. या अभ्यासात आणखी असे दिसून आले की मोबाइल वापरणारे लोक शौचालयात अधिक वेळ घालवतात. बहुतेक जण प्रत्येक वेळेला किमान पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात. सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधे देऊन आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आजार बळावल्यास थेट शस्त्रक्रिया करावी लागते.
पारंपरिक कारणे कोणती?
जीवनशैली व काही वैद्यकीय कारणांमुळे पाइल्स होण्याचा धोका वाढतो
बद्धकोष्ठतेमुळे मलविसर्जनावेळी जास्त जोर लावणे
शौचालयात दीर्घकाळ बसून राहणे
कमी फायबरयुक्त आहार घेणे, उदा. जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, आहारात फळे-भाज्यांचा अभाव
लठ्ठपणा व व्यायामाचा अभाव
गर्भधारणा
वय वाढणे, गुदाशयाभोवतीच्या शिरांना आधार देणारी ऊतकं कमकुवत होणे
४६%
मूळव्याधीचा धोका त्यांना जास्त असतो जे शौचालयात मोबाइल फोन वापरतात
एआय इमेज
मोबाइल फोन हे नवीन कारण कसे?
मोबाइलमुळे लोक शौचालयात गरजेपेक्षा जास्त वेळ बसतात.
१० ते १५ मिनिटे किंवा त्याहूनही अधिक वेळ लोक बसतात.
इतका वेळ टॉयलेट सीटवर बसल्याने गुदाशयातील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो.
रक्तवाहिन्या सुजतात आणि पाइल्सची समस्या निर्माण होते.
शौचालयात लोक सर्वाधिक वेळ कशात घालवतात?
१. बातम्या वाचणे
२. सोशल मीडियावर स्क्रोलिंग
3. गेमिंग
मूळव्याधीपासून बचाव कसा कराल?
शौचालयात मोबाइल फोन घेऊन जाऊ नका.
शौचालयात बसण्याचा वेळ मर्यादित म्हणजे ५ मिनिटांपेक्षा कमी ठेवा.
आहारात फायबरयुक्त पदार्थ (फळे, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य) समाविष्ट करा.
पुरेसे पाणी प्या.
नियमित व्यायाम करा. साध्या चालण्यामुळेही पचन सुधारते आणि रक्ताभिसरण सुरळीत होते.
मलविसर्जनाची नैसर्गिक वेळ टाळू नका.
जास्त जोर लावणे टाळा.