Corona Vaccination after how many days one can consume alcohol | Corona Vaccination: डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचं नाही?

Corona Vaccination: डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचं नाही?

- जितेंद्र कालेकर

ठाणे : जिल्हाभर आता कोविडवरील लसीकरणाचा दुसरा डोस दिला जात आहे. याच दरम्यान लसीकरणाआधी आणि नंतर मद्यपान करायचे की नाही? यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. असे असले तरी शक्यतो लसीकरणापूर्वी ४८ तास आणि कोविडची लस घेतल्यानंतर किमान २८ दिवस तरी मद्यपान केले जाऊ नये, असे मत ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले आहे.

सुरुवातीला ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर आता ४५ वर्षांवरील नागरिकांना ती दिली जात आहे. संपूर्ण जिल्ह्या गुरुवापर्यंत ६१ लाख ८० हजार ३६६ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुळात, कोरोनावरील लसीकरण करण्यासाठीही अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. कोरोनावरील लस संपूर्णपणे सुरक्षित असून, त्यापासून कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. तिचा अधिक चांगल्याप्रकारे परिणाम होण्यासाठी शक्यतो लसीकरणानंतर मद्यपान करू नये, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. त्याचवेळी काही डॉक्टरांनी लसीकरण आणि मद्यपानाचा काही संबंध नसल्याचेही सांगितले. परंतु, मद्यपान केलेले असल्यास लसीकरणानंतर एखादी रिअ‍ॅक्शन झाल्यास रुग्णाला धोका होऊ शकतो. त्यामुळेच मद्यपान न करण्याचा सल्ला दिला जातो, असेही बोलले जाते. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मात्र लसीकरणानंतर एक महिना मद्यपान करू नये, असा सल्ला दिला आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविडवरील लसीकरण झाल्यानंतर किमान २८ दिवसांपर्यंत मद्यपान करू नये. अल्कोहोल आणि कोरोनावरील लसीचा संयोग झाल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. परिणाम तीव्र होऊन रुग्णाला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे लस घेण्याआधी दोन दिवस आधी आणि नंतर २८ दिवसांपर्यंत मद्यपान करू नये.
- डॉ. प्रसाद भंडारी, प्रभारी, कोविड जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

लसीकरणानंतर ३० दिवस आणि लसीकरणापूर्वी ४८ तास मद्यपान करू नयेत, असे संकेत आहेत. तरीही त्याचे पालन न केल्यास अंगदुखी, उलट्या होणे आणि प्रचंड थकवा जाणवतो. त्यामुळे कोविडवरील लस घेतल्यानंतर मद्यपान न करणे योग्य राहील. - डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे, (एमडी फिजिशियन) ग्लोबल रुग्णालय, ठाणे महापालिका, ठाणे

लसीकरणापूर्वी ४८ तास आणि लसीकरणानंतर किमान १४ ते २८ दिवस मद्यपान करू नये. लस आणि मद्याच्या संयोगाने प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच कधी कधी मद्यामुळे घातक परिणामही संभवतात. त्यामुळे लसीकरणानंतर मद्यपान न केल्यास त्याचा फायदा मोठा होऊ शकतो.
    - डॉ. राहुल पांडे, (एमडी फिजिशियन), मेट्रोपोल रुग्णालय, मानपाडा, ठाणे

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास प्रतिकारशक्ती कमी होते. अशी प्रतिकारशक्ती कमी झाल्यास लसीचा प्रभाव राहत नाही. कोरोना होऊ नये म्हणून मद्यपान करू नये. तसेच लसीकरणानंतरही करू नये, तर लसीचा चांगल्याप्रकारे परिणाम होऊ शकतो.
    - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेली दारू विक्री
देशी दारू २१,२४,०६१ लीटर
विदेशी दारू २३,४५,३७८ लीटर
बीयर ४३,६५,९४२  लीटर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccination after how many days one can consume alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.