Coronavirus: दिलासा! कोरोना लसीसोबतच आता आणखी दोन औषधं बाजारात येणार; रुग्णांसाठी 'संजीवनी' ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:23 IST2021-07-23T19:19:06+5:302021-07-23T19:23:03+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि रसायन खते मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, या दोन्ही औषधांची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे.

Coronavirus: दिलासा! कोरोना लसीसोबतच आता आणखी दोन औषधं बाजारात येणार; रुग्णांसाठी 'संजीवनी' ठरणार
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा शरीरावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी लसीसोबतच आता आणखी दोन औषधं रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. ही दोन्ही औषधं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मदतीनं विविध संस्था आणि औषध बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून तयार केले जात आहे. या दोन्ही औषधाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे.
पुढील काही महिन्यात कोरोना रुग्णांसाठी ही औषधं उपलब्ध होतील असा अंदाज केंद्र सरकारला आहे. कोरोना रुग्णांसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने ओरल मेडिसिन उमीफेनोविर विकसित केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सीएसआयआरच्या वैज्ञानिकांच्या मते, या औषधाची क्लिनिकल चाचणी पूर्ण झालेली आहे. परंतु अद्याप काही औपाचारिकता बाकी आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर बाजारात लॉन्च करण्यात येईल.
मोलानुपिरवीरचं नवं तंत्रज्ञान विकसित
या औषधाशिवाय सीएसआयआर आणि एनआयआयएसटीने बाजारात याआधीच उपलब्ध असणारं अँन्टिव्हायरल औषध मोलानुपिरवीरचं नवं तंत्रज्ञान विकसित केले आहे. सीएसआयआर आणि एनआयआयएसटीसोबत कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले हे औषध बनवणारी कंपनी ऑप्टिमस फार्मा मेडिसिनला बाजारात लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ येणार नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि रसायन खते मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, या दोन्ही औषधांची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. औषध बनवणारी कंपनी ऑप्टिमस फार्मानं म्हटलंय की, औषधांची जी क्लिनिकल चाचणी झाली ती सकारात्मक परिणाम देणारी आहे. चाचणी दरम्यान ज्या रुग्णांना हे औषधं दिलं ते सामान्य कोरोना रुग्णांच्या तुलनेत न केवळ मृत्यूचा धोका टाळला तर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचीही वेळ येत नाही.
ड्रग कंट्रोलरच्या मान्यतेची प्रतिक्षा
या औषधांच्या आपत्कालीन वापरासाठी औषध बनवणाऱ्या कंपनीने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज दिला आहे. ही दोन्ही औषधं बाजारात येतील निश्चितपणे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. याआधी डीआरडीओ(DRDO)ने त्यांची टू डीजी औषध रुग्णांसाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं होतं.