विज्ञान आणि परंपरांची सांगड: इंटेग्रेटिव्ह कॅन्सर केअरबद्दल डॉ. रवी गुप्ता यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:25 IST2025-05-22T11:15:06+5:302025-05-22T11:25:34+5:30

Health Tips : परंपरा आणि आधुनिकतेतील हा नाजूक समतोल साधण्यासंदर्भात मुंबईस्थित आयुर्वेद आणि पंचकर्म स्पेशालिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी आपले मत मांडले.

Combining Science and Tradition Dr. Ravi Gupta's View on Integrative Cancer Care | विज्ञान आणि परंपरांची सांगड: इंटेग्रेटिव्ह कॅन्सर केअरबद्दल डॉ. रवी गुप्ता यांचे मत

विज्ञान आणि परंपरांची सांगड: इंटेग्रेटिव्ह कॅन्सर केअरबद्दल डॉ. रवी गुप्ता यांचे मत

Health Tips : कर्करोगावरील उपचारांना बऱ्याचदा एक लढाई म्हणूनच संबोधले जाते. मात्र, रुग्णांना उपचारांनंतर जे त्रास होतात, बरे होण्याची ती प्रक्रियाही तितकीच वेदनादायी असते. केमोथेरपी, रेडिएशन आणि अ‍ॅलोपथीमधील इतर उपचारांमुळे कर्करोगाच्या पेशी मारणे शक्य होत असेल. मात्र, त्यामुळे माणसाच्या शरीरावर, मनावर जो ताण येतो त्याची मोजदादच करता येणार नाही. याच महत्त्वाच्या टप्प्यावर हल्ली अधिकाधिक रुग्ण अधिक साह्यासाठी भारताच्या प्राचीन ज्ञानशाखेकडे वळत आहेत. हा मार्ग मूळ उपचारांचा पर्याय म्हणून नाही तर त्यासोबत पत्करला जात आहे.

परंपरा आणि आधुनिकतेतील हा नाजूक समतोल साधण्यासंदर्भात मुंबईस्थित आयुर्वेद आणि पंचकर्म स्पेशालिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी आपले मत मांडले. आयुर्वेदाच्या माध्यमातून कर्करोगाचे व्यवस्थापन यावर त्यांचा विशेष भर आहे. कर्करोग रुग्णांना त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमता परत मिळवण्यात आयुर्वेद कशी महत्त्वाची आणि दमदार भूमिका बजावतो, हे त्यांनी स्पष्ट केले.

“आयुर्वेदामुळे कर्करोग बरा होतो, असे आमचे म्हणणे नाही,” असे डॉ. गुप्ता त्यांच्या यूट्यूब व्यासपीठावर प्रदर्शित झालेल्या एका दमदार व्हिडीओच्या सुरुवातीला सांगतात. “मात्र, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या साह्याने रुग्णांना कर्करोगाच्या उपचारांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यात आयुर्वेदाची मदत होते, हे आम्हाला नमूद करायचे आहे.”

या व्हिडीओमध्ये डॉ. गुप्ता यांच्यासोबत कर्करोगातून बरी झालेली एक महिला आपली भावनिक आणि शारीरिक स्थिती मांडत आहे. केमोथेरपीचे अनेक राऊंड्स झाल्यानंतर या महिलेला अन्नपचन, चालणे यात त्रास होऊ लागला आणि एकुणातच दैनंदिन आयुष्यातला आनंद हरपला. या त्रासामुळे त्यांनी आयुर्वेदाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या प्रकृतीला (शरीराची प्रकृती) साजेसे आहारविषयक सल्ले आणि काही हलक्या हर्बल औषधांसह पचनशक्ती सुधारण्यातून या आयुर्वेदिक उपचारांना सुरुवात झाली. शरीरातील हे आतंरिक संतुलन पुन्हा सुधारल्याने शरीरात पोषकद्रव्ये पुन्हा शोषली जाऊ लागली. परिणामी शरीराला पुरेसी ऊर्जा मिळाल्याने त्यांना साध्या शारीरिक हालचाली करणे पुन्हा जमू लागले.

“आयुर्वेदाने मला माझे शरीर पुन्हा मिळवून दिले,” असे त्या या व्हिडीओत सांगतात. “आता मी खाऊ शकते. मी पुन्हा शांत झोपू शकते. माझ्या शरीराने मलाच नाकारणे आता बंद झाले आहे.”

या मार्गावर त्यांना साह्य करणारे डॉ. गुप्ता यांनी या महिलेच्या शारीरिक स्थितीसोबतच त्यांचे मानसिक आरोग्य कसे सुधारले हेसुद्धा सांगितले. “आम्ही फक्त अधिक चांगली पचनशक्ती, अधिक चांगली झोप यावर लक्ष देत नव्हतो. त्यांच्या भावनिक स्थितीतही बदल होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. भीती आणि थकव्यापासून चिकाटी ते आशेपर्यंतचा हा प्रवास होता.”

समतोल साधणारे विज्ञान

डॉ. गुप्ता यांच्या मते मानवी शरीर आणि मन यांचा समग्र दृष्टिकोनातून विचार करणे हे आयुर्वेदाचे बळ आहे. फक्त व्याधीवर भर न देता यात आहार, जीवनशैली, पचनशक्ती, भावनिक स्थिती आणि दैनंदिन लय यातील असमतोल शोधला जातो. “विशेषत: कर्करोगासारख्या उपचारच गंभीर असणाऱ्या आजारात काळजी घेताना आयुर्वेद आपल्या शरीराला त्याची नैसर्गिक लय पुन्हा मिळवण्यात साह्य करते,” असे त्यांनी सांगितले.

कर्करोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या दैनंदिन वेळापत्रकात डीटॉक्स थेरपी, कोमट तेलाने मसाज करून चयापचय प्रणाली सुयोग्य राखणे आणि जळजळ वाढवणारे पदार्थ वगळून आहार यांचा समावेश असतो. अश्वगंधा आणि त्रिफळा असे हर्बल टॉनिकही सुचवले जातात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या औषधांनी रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातील ऊर्जेची मात्रा पुन्हा सुधारण्यास साह्य लाभते.

खबरदारी आणि सहकार्य

आयुर्वेद हा कर्करोगावर स्वतंत्र उपचार नाही, हे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. “आम्ही आँकोलॉजिस्ट किंवा कर्करोगतज्ज्ञांच्या सोबत काम करतो. आम्ही केमोथेरपी किंवा रेडिएशनच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करत नाही. पण, ज्यावर उपचार झाले नाहीत अशा मुद्द्यांवर म्हणजेच भूक, झोप, ताकद, पचनशक्ती, मन:शांती यासाठी आम्ही साह्य करतो,” असे त्यांनी सांगितले.

ओव्हर-द-काऊंटर स्वत:च औषधे घेण्याबद्दलही त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. “प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आयुर्वेद हे सर्वांसाठी सारखे किंवा जेनेरिक नाही. एखादी औषधी एखाद्या रुग्णाला फायद्याची ठरत असेल तर दुसऱ्याला अजिबात चालत नसेल. त्यामुळे प्रमाणित आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

एकात्मिक विचारसरणीची गरज

भारतातील आयुष मंत्रालयाने फार पूर्वीच आधुनिक आरोग्य व्यवस्थेत आयुर्वेदाचा समावेश करण्याची, विशेषत: गंभीर आणि जीवनशैली आजारांसाठी, शिफारस केली आहे. आँकोलॉजीमध्ये हा समावेश आताशा सुरू झाला आहे मात्र त्याकडे लक्ष वेधले जात आहे, हे नक्की.

“कर्करोग रुग्णाला जे सहन करावे लागते ते सर्व फक्त औषधांनी बरे होणारे नाही, याबद्दलची जागरुकता वाढत आहे,” असे डॉ. गुप्ता म्हणाले. “त्यासाठी टीम लागते… आँकोलॉजिस्ट, केअरगीव्हर्स, सायकॉलॉजिस्ट, न्युट्रिशनिस्ट आणि हो, काही रुग्णांसाठी आयुर्वेदिक तज्ज्ञ.”

या महिला रुग्णाच्या बाबतीत त्यांची रिकव्हरी फक्त वैद्यकीय नव्हती, ती वैयक्तिक स्वरुपाचीही होती. त्यांच्या या प्रवासातून अनेक रुग्णांची सत्यपरिस्थिती दिसून येते: कर्करोगानंतर त्यांना फक्त जिवंत रहायचे नसते, त्यांना पुन्हा जगायचे असते. आयुर्वेदाने हेच करण्यात त्यांची मदत केली.

पूर्ण व्हिडीओ पहा

कर्करोग रुग्णाच्या रिकव्हरीत आयुर्वेदाने कसे साह्य केले – डॉ. रवी गुप्ता यांनी शेअर केलेला व्हिडीओ

कॅन्सर सपोर्टमध्ये आयुर्वेदाचे कसे साह्य होते (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली)

- केमोथेरेपीमुळे होणारी मळमळ, अपचन, बद्धकोष्ठता आणि थकवा अशा त्रासांतून आराम

- वैयक्तिक स्वरुपावर दिल्या जाणाऱ्या हर्बल औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढणे

- शरीराची अंतर्गत स्वच्छता आणि अवयवांना साह्य करण्यासाठी पंचकर्म डीटॉक्स थेरपी

- लाइफस्टाईलमधील बदल, श्वासाचे व्यायाम आणि झोप नियमित करून मानसिक पातळीवर शांत करणे

- वैयक्तिक दोषानुसार (शारीर प्रकृती) तयार केलेले सुयोग्य आहार प्लॅन

कायम आपातकालीन स्थिती आणि परिणामांवर देणाऱ्या आरोग्यव्यवस्थेत उपचार पद्धतीत पुन्हा एकदा सन्मान, सहानुभूती आणि समतोल साधण्याला महत्त्व देणे, हे डॉ. रवी गुप्ता यांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या या व्यासपीठावरील कथाकथनातून अधिकाधिक रुग्ण, कुटुंब आणि डॉक्टरांना एकात्मिक दृष्टिकोन बाळगण्याची प्रेरणा देण्याचे प्रयत्न ते करत आहेत. या मार्गावर प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकमेकांपासून दूर नाही तर एकमेकांसोबत काम करतात.

“हीलिंग म्हणजे फक्त आजारातून वाचणे इतकेच नसते. लोकांना पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यात, ताकदीने, शांततेने आणि आत्मविश्वासाने जगण्यास मदत करणे म्हणजे हीलिंग,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

Web Title: Combining Science and Tradition Dr. Ravi Gupta's View on Integrative Cancer Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.