भारतात वाढताहेत कर्करोगाचे रुग्ण; 2040 पर्यंत रुग्णसंख्या 20 लाखांवर जाणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:16 IST2025-12-19T19:11:35+5:302025-12-19T19:16:25+5:30
हा आकडा देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा इशारा आहे.

भारतात वाढताहेत कर्करोगाचे रुग्ण; 2040 पर्यंत रुग्णसंख्या 20 लाखांवर जाणार...
Cencer in India: भारताl कर्करोग ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. एकेकाळी वृद्धांशी संबंधित मानला जाणारा हा आजार आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतोय. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, असंतुलित आहार आणि लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती कायम राहिली तर 2040 पर्यंत भारतातील कर्करोग रुग्णांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा केवळ धक्कादायक नसून देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठीही मोठा इशारा आहे.
भारतावर वाढता कर्करोगाचा भार
राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या वेळी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आजारांचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी वृद्धांमध्ये आढळणारे आजार आता कमी वयातच दिसू लागले आहेत आणि कर्करोग त्यापैकी एक प्रमुख आजार ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णसंख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कर्करोग रुग्ण आहेत.
2024 पर्यंत कर्करोगाचे रुग्ण वाढणार
1) वृद्ध लोकसंख्येतील वाढ
भारतामध्ये 60 वर्षांवरील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वय वाढल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. अभ्यासानुसार 60 ते 74 वयोगटात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळते. लोकसंख्येचा आकार आणि वयाची रचना बदलत असल्याने एकूण रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
2) जीवनशैलीशी संबंधित सवयी
आजची जीवनशैली कर्करोगाला आमंत्रण देते. वैद्यकीय संशोधनानुसार भारतामधील सुमारे 70 टक्के कर्करोगाचे प्रकार टाळता येऊ शकतात, मात्र त्यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे.
मुख्य कारणांमध्ये तंबाखू, गुटखा सेवन, मद्यपानाचे अति प्रमाण, जंक फूड व असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभावाने आलेला लठ्ठपणा...यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामध्ये तंबाखू हे आजही कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे.
प्रदूषणही मोठा धोका
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वायू प्रदूषणाला कर्करोगास कारणीभूत घटक म्हटले आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये PM2.5 चे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकाळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो, अगदी कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांमध्येही.
भारतात कोणते कर्करोग वाढत आहेत?
महिलांमध्ये: स्तनाचा कर्करोग सर्वाधिक, त्यानंतर गर्भाशय मुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग
पुरुषांमध्ये: तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग
फुफ्फुसांचा कर्करोग आता महिलांमध्येही वाढताना दिसतो
शहरी भागात: कोलोरेक्टल (आतड्यांचा) कर्करोग वाढतो आहे
ईशान्य राज्यांमध्ये: डोके आणि मानेचे कर्करोग अधिक प्रमाणात
सरकारी व आरोग्य संस्थांच्या अंदाजानुसार, प्रत्येक 9 पैकी 1 भारतीयाला आयुष्यात कधी ना कधी कर्करोग होण्याची शक्यता आहे. यावरून हा आजार आता कोणत्याही एका वयोगटापुरता किंवा वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही, हे स्पष्ट होते.
सरकारची तयारी आणि उपाययोजना
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, देशातील जवळपास प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. कर्करोगाचे उपचार कमी खर्चात किंवा मोफत उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने एक व्यापक राष्ट्रीय योजना राबवली जात असून, कर्करोगाचा वाढता धोका रोखण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केल्या जात आहेत.