महिलांच्या चेहऱ्यावर दिवसातून सरासरी ६२ वेळा फुलतं हसू; पुरुष केवळ ८ वेळाच हसतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:29 IST2021-04-28T11:26:19+5:302021-04-28T11:29:55+5:30
हास्याचा संबंध थेट मेंदूशी असल्यानं त्याचे अनेक फायदे आहेत; हसण्यामुळे शरीराला कित्येक लाभ होतात

महिलांच्या चेहऱ्यावर दिवसातून सरासरी ६२ वेळा फुलतं हसू; पुरुष केवळ ८ वेळाच हसतात
तुम्ही दिवसातून किमान एखाद्या अनोळखी व्यक्तीला उगाच स्माईल द्या. दिवसभर ती व्यक्ती तुमचा विचार करत राहील. ती व्यक्ती माझ्याकडे पाहून का हसली, मी तिला ओळखतो का, याचा विचार दिवसभर त्या व्यक्तीच्या मनात सुरू राहील. याचं कारण एका स्माईलमागे दडलंय. हसण्यात प्रचंड पॉझिटिव्ह उर्जा आहे. हसण्यामुळे ताणतणाव दूर होतो. माणसं जोडली जातात. त्यामुळेच तर कायम आनंदी राहा. हसत राहा, असं म्हटलं जातं.
तुम्ही जितकं आनंदी राहाल, हसतमुख हसाल, तितका तुमचा मेंदू उत्तम स्थितीत राहतो. कारण हास्याचा संबंध थेट मेंदूशी असतो. एका हास्यामुळे बरंच काही घडू शकतं. तुमच्या एका हास्यामुळे कोणाचातरी दिवस अविस्मरणीय होऊ शकतो. हास्यामुळे तुमचा स्वत:चा दिवसदेखील अतिशय उत्तम जाऊ शकतो. हास्यामुळे आत्मविश्वास मिळतो. त्यामुळेच १९९९ पासून जागतिक हास्य दिन साजरा होऊ लागला.
फुफ्फुसांना मजबूत अन् आजारांपासून लांब ठेवायचं? मग वेळीच 'या' पदार्थांपासून ४ हात लांब राहा
सध्या संपूर्ण जग कोरोना संकटातून जातंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरतोय. हास्याचा फैलावदेखील तितक्याच वेगानं होतो, असं अनेक सर्वेक्षणांतून समोर आलं आहे. एक महिला साधारणत: दिवसातून सरासरी ६२ वेळा हसते. तर पुरुषांच्या चेहऱ्यावर दिवसातून केवळ ८ वाजता हास्य फुलतं. हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो. तुम्ही फोनवर बोलताना हसत असाल, तर समोरील व्यक्ती अधिक मैत्रीपूर्ण भावनेतून तुमच्याशी संवाद साधते.
तुम्ही जेव्हा हसता, तेव्हा २२ स्नायू काम करतात. तर ज्यावेळी तुमच्या कपाळाला आठ्या पडतात, त्यावेळी कार्यरत असलेल्या स्नायूंची संख्या ३७ इतकी आहे. त्यामुळे थोडक्यात हसण्यानं तुमच्या शरीराची ऊर्जादेखील वाचते. म्हणूनच तर जॉर्ज एलियॉट यांनी 'चेहऱ्यावर हास्य ठेवा अन् मित्र बनवा. चेहऱ्यावर आठा पाडा अन् सुरकत्या मिळवा,' असं म्हटलंय. त्यामुळे तुम्हाला मित्र हवेत की सुरकुत्या हे तुमचं तुम्हीच ठरवा.