व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 09:08 IST2025-02-23T09:08:19+5:302025-02-23T09:08:28+5:30

व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ यांची कमतरता भासणे आता सर्वसामान्य झाले आहे. या दोन्ही जीवनसत्वांची उणीव भरून काढण्यासाठी वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. योग्य औषधांमुळे हा त्रास कमी होऊ शकतो...

Are you experiencing a deficiency of Vitamin D and Vitamin B12? | व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का?

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का?

- डॉ. संपदा संत 
अधिष्ठाता, आर. ए. पोदार 
आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय 
ल्ली व्हिटॅमिन डी आणि बी १२ची कमतरता भासत असलेले अनेकजण आपल्या आजूबाजूला हमखास दिसतात. प्रत्येकाची जीवनशैली आणि आहाराची पद्धत वेगवेगळी असते. या दोन्हींमधील काही त्रुटींमुळे व्हिटॅमिन डी आणि बी १२ रुसून बसत असतात. त्यांना जागेवर आणण्यासाठी नैसर्गिक आणि वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. 

प्रत्येकाच्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, फॅट्स इत्यादींची जशी आवश्यकता असते, तशीच जीवनसत्त्वांचीही (व्हिटॅमिन्स) गरज असते. पाण्यात आणि चरबीत विरघळणारे अशा दोन प्रकारांमध्ये व्हिटॅमिन्सची विभागणी असते. व्हिटॅमिन डी चरबीत, तर बी १२ पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन डी मुख्यत: सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळते. आपल्या त्वचेतील एक रासायनिक प्रक्रिया सूर्याच्या अतिनील किरणांमुळे व्हिटॅमिन डी तयार करते. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातूनही व्हिटॅमिन डी मिळते. 

कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे दुखणे, अशक्तपणा आणि हाडे ठिसूळ (ऑस्टियोपोरोसिस) होऊ शकतात. तसेच थकवा, मूड स्विंग्ज आणि प्रतिकारशक्ती कमी होते. 
व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुग्धजन्य पदार्थ, वनस्पतीपासून प्राप्त पदार्थ, ओट, मोहरी, गहू, तांदूळ, मका इ. तृणधान्य, सोया, बदाम, पिस्ता, काजू, खजूर, मनुका, अंजीर, भोपळा, सूर्यफुलांच्या बिया, चीज, मशरूम इ. तसेच ब्रेड, काही चॉकलेट यांच्या आहाराच्या माध्यमातूनही भरून काढता येऊ शकते. शाकाहारींमध्ये बी १२ची उणीव अधिक असते. 

कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि मानसिक अस्वस्थता दिसू शकते. यामुळे नर्व्हस सिस्टमवरही परिणाम होऊ शकतो, जसे की न्यूरोपॅथी. भारतामध्ये सूर्यप्रकाश कमी असलेल्या ठिकाणी राहणारे किंवा घरामध्ये जास्त वेळ घालविणाऱ्या लोकांसाठी व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. याशिवाय, शाकाहारी आहार घेणाऱ्यांना व्हिटॅमिन बी १२ मिळवणे अधिक कठीण होते, कारण याचे मुख्य स्रोत मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी या दोन्ही व्हिटॅमिन्सचे योग्य प्रमाण आवश्यक आहे. 
व्हिटॅमिन बी १२ व व्हिटॅमिन डी हे पदार्थ आहारातून प्राप्त होत नसल्यास ते आपण औषधी स्वरूपात गोळ्यांच्या माध्यमाने किंवा इंजेक्शनच्या माध्यमाने वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ शकतो. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे योग्य आहार आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून या दोन्हींचे प्रमाण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपरोक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये सध्याच्या स्थितीला कमी असतात त्यामुळे अधिकाधिक लोकांना व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येत आहे. 
 

Web Title: Are you experiencing a deficiency of Vitamin D and Vitamin B12?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.