हृदयविकाराचं आणखी एक नवं कारण आलंय समोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 15:19 IST2017-11-13T15:18:48+5:302017-11-13T15:19:50+5:30
काय आहे हे कारण? सांभाळा स्वत:ला आणि वागा त्याप्रमाणे..

हृदयविकाराचं आणखी एक नवं कारण आलंय समोर!
- मयूर पठाडे
नेमका कशामुळे येतो हार्ट अॅटॅक? हृदयविकाराची कारणं काय? आतापर्यंत यासंदर्भात अनेक कारणं सांगितली गेली, ती आपल्याला माहीतही आहेत. अर्थातच त्यात चुकीचं काहीच नाही. ही सर्व कारणं बरोबरच आहेत. टेन्शन, धुम्रपानापासून तर आपल्या अयोग्य जीवनशैलीपर्यंत अनेक कारणं हृदयविकाराला कारण ठरू शकतं.
पण आता आणखी एक नवं कारण समोर आलं आहे. आपल्या रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, तरीही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
फॉस्फेट म्हणजेच एक प्रकारचं खनीज. आपल्या शरीरात खनिजं आवश्यकच असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही आपल्याला होऊ शकतात, त्यातलाच आणखी एक आजार म्हणजे हृदयविकार.
यापूर्वीही शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. ती होती खनिजांचं प्रमाण आपल्या शरीरात जास्त असलं तर काय होतं? अर्थातच हे प्रमाण जास्त असलं तरीही आपल्याला विविध विकारांना सामोरं जावं लागतं. आत्ता संशोधकांनी जी चाचणी घेतली, ती होती शरीरातील खनिजांचं, विशेषत: रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण कमी झालं तर शरीरावर त्याचा काय दुष्परिणाम होतो याची. शास्त्रज्ञांचा दावा आहे की अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे आणि त्यासाठी तब्बल एक लाख पेशंट्सचा पाच ते नऊ वर्षांपर्यंत अभ्यात करण्यात आला.
त्यातून हे निरीक्षण समोर आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांचा प्रत्येकाला सल्ला आहे की आपल्या शरीरातील खनिजांचं प्रमाण प्रत्येकानं योग्य तेवढंच; म्हणजे कमीही नाही आणि जास्तही नाही.. असंच राखलं पाहिजे.