स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ‘एआय’चा मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:16 IST2025-10-16T09:16:23+5:302025-10-16T09:16:29+5:30
ॲपमुळे स्तन कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील गाठी ओळखण्यात मदत होणार असून, त्यामुळे उपचार लवकर सुरू करून रुग्णांचे जीवन वाचवणे शक्य होईल.

स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ‘एआय’चा मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्तन कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य होते. मात्र, काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात गाठी अतिशय सूक्ष्म असल्याने पारंपरिक चाचण्यांत त्यांचे निदान करणे कठीण असते. यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालय आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित दोन विशेष ॲप विकसित केले जात आहे.
ॲपमुळे स्तन कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील गाठी ओळखण्यात मदत होणार असून, त्यामुळे उपचार लवकर सुरू करून रुग्णांचे जीवन वाचवणे शक्य होईल.
२५ पैकी एका महिलेला धोका
भारतात स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. एकूण कर्करोगांपैकी सुमारे ३० टक्के स्तन कर्करोगाचे असतात. अंदाजे प्रत्येक २० ते २५ महिलांपैकी एका महिलेला हा धोका असतो. या पार्श्वभूमीवर निदानाच्या अचूकतेसाठी सोनोग्राफी आणि मॅमोग्राफीच्या अहवालांचे बारकाईने विश्लेषण होणे आवश्यक आहे.
स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निदान वेगवान होण्यास ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सोनोग्राफीवरील निदानासाठी ‘प्रज्ञा’ आणि मॅमोग्राफीवर आधारित तपासणीसाठी ‘प्रेक्षा’ हे ॲप तयार होत आहेत. यामध्ये टाटा रुग्णालयातील याआधीच्या उपचारांचा डेटा आणि बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले एआय तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. दोन्ही ॲप पुढील सहा महिन्यांत रुग्णांसाठी उपलब्ध होतील. त्याद्वारे निदानाची अचूकता वाढेल व उपचार अधिक कार्यक्षम होतील.
- डॉ. सुयश कुलकर्णी, रेडिओलॉजी विभागप्रमुख, टाटा मेमोरियल सेंटर
ग्रामीण भागातही निदान शक्य
सध्या अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी व मॅमोग्राफी तपासण्यांचे परिणाम अचूकपणे विश्लेषण करणारे प्रशिक्षित तज्ज्ञ उपलब्ध नसतात. यामुळे या आजाराच्या निदानात उशीर होण्याची शक्यता असते. ती लक्षात घेऊन ‘प्रेक्षा’ आणि ‘प्रज्ञा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपचा उपयोग डॉक्टरांसाठी मोठा आधार ठरणार आहे. ग्रामीण रुग्णालये किंवा इमेजिंग सेंटरमधील डॉक्टर सोनोग्राफी व मॅमोग्राफीचे तपशील या ॲपवर अपलोड केल्यास, काही मिनिटांतच एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे विश्लेषण होऊन योग्य निदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागांतील महिलांनाही वेळेवर व अचूक उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.