अबब! १० वर्षीय मुलाच्या तोंडात बत्तीशी नव्हे तर ५० दात; हैराण झालेल्या डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, मग..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:56 IST2022-03-01T13:56:20+5:302022-03-01T13:56:43+5:30
जर वेळीच या मुलावर उपचार झाले नसते तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं असते असं डॉक्टरांनी सांगितले.

अबब! १० वर्षीय मुलाच्या तोंडात बत्तीशी नव्हे तर ५० दात; हैराण झालेल्या डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, मग..
नवी दिल्ली – साधारणपणे मानवी शरीराच्या अंगाबाबत काही दुर्लभ घटना समोर येत असतात. कुणाचं शरीर जुळालेलं असतं, तर कुणाच्या हातांना इतरांच्या पेक्षा जास्त बोट असतात. मध्य प्रदेशातील एका अशाच घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. माणसाच्या तोंडात बत्तीशी असते म्हणजे ३२ दात असतात असं म्हणतात. पण मध्य प्रदेशात १० वर्षीय मुलाच्या तोंडात तब्बल ५० दात असल्याचं आढळलं.
या मुलाच्या दातांमध्ये वेदना होत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाची चाचणी केली तेव्हा त्याला अतिशय दुर्मिळ आजार असल्याचं उघड झालं. मेडिकल क्षेत्रात या आजाराला Odontoma असं म्हणतात. १ लाखात १ अथवा दोघांना असा आजार असतो. या प्रकरणात १० वर्षीय मुलाच्या तोंडाला सूज आल्याचं दिसून आले. अनेक दिवसांपासून त्याच्या दातामध्ये वेदना होत असल्याची समस्या होती. त्यामुळे डॉक्टरांनी या मुलाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. सचिन ठाकूर यांनी सांगितले की, जर वेळीच या मुलावर उपचार झाले नसते तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं असते. मुलाच्या तोंडात असलेल्या अतिरिक्त दातामुळे त्याच्या निरोगी दातांवरही परिणाम होऊ लागला होता. आता ३ डॉक्टरांच्या टीमनं या मुलाचं यशस्वी ऑपरेशन केले आहे. ऑपरेशनमध्ये मुलाच्या तोंडातून ३० दात काढण्यात यश आलं. १८ वर्षापर्यंत मुलाच्या तोंडात ३० दात पुन्हा येतील असं त्यांनी सांगितले. हे ऑपरेशन खूप कठीण होतं. त्यासाठी डॉक्टरांना जवळपास अडीच तास लागले. आता मुलाची अवस्था ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.