बोअरवेलच्या कामांना जि.प.चा ‘ग्रीन सिग्नल’
By Admin | Updated: May 15, 2016 01:25 IST2016-05-15T01:25:13+5:302016-05-15T01:25:13+5:30
जिल्ह्यातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेत बोअरवेलची गरज असलेल्या भागांचे सर्वेक्षण करून आठ दिवसांत ही कामे करण्याचे आदेश

बोअरवेलच्या कामांना जि.प.चा ‘ग्रीन सिग्नल’
अध्यक्षांकडून सर्वेक्षणाचे आदेश : जिल्हा परिषदेची सभा
गोंदिया : जिल्ह्यातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेत बोअरवेलची गरज असलेल्या भागांचे सर्वेक्षण करून आठ दिवसांत ही कामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी दिले. गुरूवारी जिल्हा परिषद सभागृहात स्थायी समितीची सभा जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला समिती, शिक्षण समिती, कृषी समितीचे सभापती, नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी पुडकलवार, अतिरीक्त मुकाअ, उप मुकाअ व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडली.
सभेत कालीमाटी क्षेत्राचे सदस्य सुरेश हर्षे यांनी अध्यक्षांना कलम १०९ प्रमाणे समिती सदस्यांनी ७ दिवसांआधी पत्र देण्यास, कुठल्याही अधिकाऱ्यास बोलावून चर्चा घडवून आणणे किंवा सभागृहाला लेखी माहिती पुरविणे हे सदस्याचे अधिकार आहे. परंतु ५ पत्र १५ दिवसाआधी देऊनसुध्दा सभागृहाला का माहिती देण्यात आलेली नाही व संबंधित अधिकारी का उपस्थित झाले नाही हा मुद्द मांडला. यावर अध्यक्ष मेंढे व मुकाअ पुडकलवार यांनी ठळक शब्दात सात दिवसात माहिती न चुकता पुरविण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचा निधी खर्च करणे किंवा कामे मंजुरी करण्याची मंजुरी न घेता आधीच २३ मार्चला ३१८.६३ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी प्रदान करून कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली व त्यानंतर स्थायी समितीला मंजुरीकरिता सादर केल्याचा विषय मांडण्यात आला. त्यावर अध्यक्ष व मुकाअ यांनी सभागृहाचा मंजुरीचा अधिकार असताना मंजुरी न घेता आधी प्रशासकीय मंजुरी देणे चुकीचे आहे. करीता ठरावाला मंजुरी न देता पुढच्या सभेला कामाच्या यादीसह सभागृहाची मंजुरी घ्यावी असे आदेश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव परिसरात सुरू असलेले दुकान गाळे दवाखान्याच्या आवारात सुरू असून ९० टक्के कामे पूर्ण झाले व जागेच्या आखीव पत्रिकेवर जिल्हा परिषदेची मालकी आहे असे नमूद असून बांधकाम आपल्याच हद्दीत होत आहे. परंतु कार्यकारी अभियंता यांनी शहानिशा न करता बांधकाम बंद करण्याचे चुकीचे पत्र दिल्याचा विषय मांडत हर्षे यांनी सदर बांधकाम सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष व मुकाअ यांनी बांधकाम सुरू करण्याचे आदेश केले.
त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील संपूर्ण पदोन्नतीची पदे, संचमान्यता अंतीमत: मंजुर झाल्यामुळे सर्व पदोन्नती १५ दिवसात करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्ह्यात पाच दिवसांत केटल शेड, गोट शेड, पोलिट्री शेड व जिथे मग्रारोहयोची कामे सुरू झाली नाही, अशी कामे सुरू करा अशी सुरेश हर्षे यांनी मागणी केली. त्यावर मुकाअ व उप मुकाअ मग्रारोहयो यांनी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रामसेवक, सरपंच यांची मग्रारोहयो कामाबाबत पंचायत समितीस्तरावर आढावा सभा घेण्यात यावे व जोमात कामे कशी सुरू करता येईल. यानंतर पाठपुरावा करावे असे आदेश दिले.
आवास योजनेचे घरकुल वाटपाचे शासन निर्णयाप्रमाणे वाटप करावे, असा मुद्दा हर्षे यांनी उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुकाअ व जिल्हा प्रकल्प संचालक पाडवी यांनी २० मेच्या मार्गदर्शन सभेत मार्गदर्शन प्राप्त करून शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभाद्वारे वाटपाची कार्यपध्दती ठरवू असे सभागृहात सांगितले. (शहर प्रतिनिधी)