झेडपीने घेतली कोरोनाची धास्ती; कामासाठी मोबाइलवर साधा संपर्क ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST2021-04-06T04:28:14+5:302021-04-06T04:28:14+5:30

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, ...

ZP took Corona's threat; Mobile Contact for Work () | झेडपीने घेतली कोरोनाची धास्ती; कामासाठी मोबाइलवर साधा संपर्क ()

झेडपीने घेतली कोरोनाची धास्ती; कामासाठी मोबाइलवर साधा संपर्क ()

गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषदेचे सात ते आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर शासनानेसुद्धा ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामे करण्याचे व कार्यालयांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी करीत सोमवारपासून (दि.५) जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्यांना प्रवेशव्दारावर ‘नो एन्ट्री’ करण्यात आली. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा पहिल्याच दिवशी फटका बसला. जिल्हा परिषदेच्या तीन-चार विभागात ७ ते ८ कर्मचारी कोराेनाबाधित आले तर जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत गर्दी कमी करण्यासाठी सोमवारपासून बाहेरून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी केली. महत्त्वाचे काम असेल तरच आणि प्रत्यक्षात येण्याची आवश्यकता असेल तरच यावे अन्यथा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून आपली कामे करून घ्यावी, असे आदेश दिले. मात्र जिल्हा परिषदेने हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता घेतल्याने याचा कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला.

गोंदिया जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीसारखे तालुके ६० किलोमीटर अंतरावर आहेत तर तिरोडा, आमगाव तालुक्याचे अंतर हे ३० किलोमीटरचे आहे. त्यातच चिचगड, केशोरी, दरेकसासारखा भाग हा १०० किलोमीटरच्या जवळपासचा असून, येथील नागरिक, कर्मचारी हे महत्त्वाचे काम असले तरच येतात. मात्र आज सीईओंच्या अचानक घेतलेल्या या ‘नो एन्ट्री’ निर्णयाचा चांगलाच आर्थिक व मानसिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. यावेळी अनेकांनी खरोखरच जिल्हा परिषदेत पदाधिकारी असते तर अधिकारी एवढी मनमर्जी करण्यापासून थांबले असते अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशव्दारावर नो एन्ट्री केली नसल्याचे सांगत काही निर्बंध लागू केले असल्याचे सांगितले.

.....

सरपंचांना बसला फटका

गोरेगाव तालुक्यातील काही सरपंच ग्रामपंचायतीचे काही बांधकामांचे प्रस्ताव घेऊन आले होते. त्यांनाही परत जावे लागले. अधिकारी मात्र वाढता कोरोना संसर्ग बघून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत लोकांसाठीही ‘नो एंट्री’ करण्यात आल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे प्रवेशव्दारावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कुणीही आत जाणार नाही याची काळजी घेण्याची ताकीद दिली असल्याची माहिती आहे.

Web Title: ZP took Corona's threat; Mobile Contact for Work ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.