जि.प.ला लागले कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:19+5:302021-02-05T07:51:19+5:30
सडक अर्जुनी : जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण २४ जागा रिक्त आहेत. तर १३ स्थापत्य अभियंते पदोन्नतीपासून ...

जि.प.ला लागले कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण
सडक अर्जुनी : जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण २४ जागा रिक्त आहेत. तर १३ स्थापत्य अभियंते पदोन्नतीपासून वंचित असल्याने जि.प. कारभाराची सर्वत्र चर्चा होत आहे. रिक्त पदे कधी भरतील आणि १३ स्थापत्य अभियंत्यांना पदोन्नती केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या नजरेत कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांच्याशिवाय दुसरा कोणताही कर्तव्यनिष्ठ अधिकारी नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे की काय त्यांच्याकडे तीन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामध्ये बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या अतिरिक्त कार्यभारामुळे आपली जबाबदारी सहजपणे झटकून दिली जात आहे. जिल्ह्यात होत असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रभाव पडत आहे. कामाचा दर्जा अतिशय सुमार झाला असून त्यावर देखरेख करणारी यंत्रणा अतिशय तोकडी असल्यामुळे निर्माण होत असलेल्या बांधकामाची गुणवत्ता अतिशय खालावलेली आहे. कंत्राटदार काम कसे करीत आहे, यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा दिसून येत नाही. जि.प. गोंदियामध्ये १३ स्थापत्य अभियंते मागील दोन वर्षांपासून पदोन्नतीसाठी धडपडत आहे. मात्र, जि.प.चे वरिष्ठ अधिकारी केवळ मर्जीतील काही लोकांनाच अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात जि.प.चे अधिकारी धन्यता मानत आहेत. जि.प. बांधकाम विभागाला रिक्त पदाचे लागलेले ग्रहण कधी सुटेल आणि १३ स्थापत्य अभियंते यांना पदोन्नती कधी मिळेल, हा जि.प.मधील सध्या चर्चेचा विषय आहे.
बॉक्स....
मुकाअचे होतेय दुर्लक्ष
गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांचे बांधकाम विभागाकडे लक्ष नसल्यामुळे किंवा बांधकामाविषयी उदासीन असल्यामुळे सार्वजिनक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या तिन्ही ठिकाणी अधिकारी वर्ग आपले हात चांगलेच ओले करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.