जि.प.चे नवीन आरक्षण जाहीर

By Admin | Updated: April 5, 2015 01:23 IST2015-04-05T01:23:45+5:302015-04-05T01:23:45+5:30

जिल्ह्यातील ७ नगर पंचायतींची अधिसूचना जारी झाल्याने गेल्याने जिल्हा परिषदेच्या मतदार संघांमध्ये थोडा फेरबदल झाला आहे.

ZP releases new reservation | जि.प.चे नवीन आरक्षण जाहीर

जि.प.चे नवीन आरक्षण जाहीर

गोंदिया : जिल्ह्यातील ७ नगर पंचायतींची अधिसूचना जारी झाल्याने गेल्याने जिल्हा परिषदेच्या मतदार संघांमध्ये थोडा फेरबदल झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या १९ जानेवारीला काढलेली आरक्षण सोडत रद्द करून शनिवारी (दि.४) नव्याने सोडत काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत महिला सदस्य राहणार असल्यामुळे जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’ येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या ६ महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या ११ जुलैला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ५३ मतदार संघांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रत्येक सोडतीसाठी एका बरणीत संबंधित जि.प.मतदार संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी एका मुलीच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी व जिल्हाभरातून आलेले इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने हजर होते.
यापूर्वी जिल्हा परिषदेत महिलांची संख्या ३३ टक्के होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेवर ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच २७ महिला सदस्य दिसणार आहेत. या आरक्षणामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांसह अनेक दिग्गज उमेदवारांना आपला मतदार संघ सोडून जवळच्या दुसऱ्या मतदार संघात आसरा घ्यावा लागणार आहे. तर काही जणांना स्वत: बाजुला राहून आपल्या सौभाग्यवतीला सामोरे करावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
हे मतदार संघ आहेत खुल्या प्रवर्गात
गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी धापेवाड़ा, खमारी, नागरा हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर पांजरा, कुड़वा,पिंडकेपार, आसोली आणि बिरसोला हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. देवरी तालुक्यात भर्रेगांव आणि पुराडा, सालेकसा तालुक्यात पिपरिया, आमगांव खुर्द, झालिया, अर्जुनी मोरगांव तालुक्यात महागांव, सडक अर्जुनी तालुक्यात डव्वा, गोरेगांव तालुक्यात गिधाडी, गणखैरा, आमगांव तालुक्यात अंजोरा, चिरचाळबांध, घाटटेमनी, किकरीपार हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. चिचगड, कारूटोला, शेंडा, नवेगांवबांध, गोरठा, सरांडी आणि सेजगांव हे क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
जात पडताळणी नसल्यास अर्ज नामंजूर
या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसणाऱ्यांचे नामांकन स्वीकारलेच जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शकांची नियुक्तीही केली जात असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव क्षेत्र
गोंदिया तालुक्यातील एकोडी, काटी (महिला) रतनारा (महिला), देवरी तालुक्यातील ककोडी, अर्जुनी मोरगांव तालुक्यातील गोठनगांव, माहुरकुडा, केशोरी (महिला), बोंडगांवदेवी (महिला), सड़क अर्जुनी तालुक्यातील सौंदड, चिखली (महिला), गोरेगांव तालुक्यातील सोनी, आमगांव तालुक्यातील रिसामा (महिला), तिरोड़ा तालुक्यातील अर्जुनी (महिला) ओबीसीकरिता आहे.
अनुसूचित जातीकरिता आरक्षित क्षेत्र
अनुसूचित जातीसाठी जि.प. च्या ६ जागा आरक्षित आहेत. त्यामध्ये गोटाबोडी, कवलेवाड़ा आणि गोंदिया तालुक्यातील कामठा या जागांचा समावेश आहे. तसेच अनुसूचित जातीच्या महिलांकरिता पांढरी, कुऱ्हाडी आणि ठाणेगाव येथील जागा आरक्षित आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव क्षेत्र
अनुसूचित जमातीकरिता जिला परिषदेच्या १० जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यात गिधाड़ी, गणखैरा, पांढराबोडी, अंजोरा आणि महागांव येथील जागांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती महिलांकरिता सुकड़ी डाकराम, इटखेडा, घोटी, वड़ेगांव आणि फुलचूर जि.प.च्या जागांचा समावेश आहे.

Web Title: ZP releases new reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.