शिक्षकांच्या मागणीसाठी जि.प. शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: March 17, 2017 01:36 IST2017-03-17T01:36:58+5:302017-03-17T01:36:58+5:30
शिक्षकाची बदली न करता रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकाची नियुक्ती करावी या गावकऱ्यांच्या व शाळा समितीच्या मागणीकडे

शिक्षकांच्या मागणीसाठी जि.प. शाळेला ठोकले कुलूप
अधिकाऱ्यांची पाठ : विद्यार्थ्यांनी झाडाखाली केले ज्ञानार्जन
साखरीटोला : शिक्षकाची बदली न करता रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकाची नियुक्ती करावी या गावकऱ्यांच्या व शाळा समितीच्या मागणीकडे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने अखेर गावकऱ्यांनी रामपूर येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला गुरूवारी (दि.१६) कुलूप ठोको आंदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून ज्ञानार्जन करावे लागले.
आमगाव पं.स. अंतर्गत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा रामपूर (पानगाव) येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र त्या मानाने शिक्षक कमी आहेत. असे असताना सुद्धा सहायक शिक्षक हेमने यांच्या बदलीचा आदेश शिक्षण विभागाने काढला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शिक्षक हेमने यांची बदली न करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आमगाव यांना निवेदन दिले. तरीसुद्धा त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. तसेच स.शिक्षक टांगशे हे शाळेत नेहमी गैरहजर असतात. विद्यार्थ्यांना बरोबर शिकवित नाही तसेच नशेत राहतात, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अशा शिक्षकाची बदली करावी व त्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली.
कुलूप ठोकण्याची माहिती मिळताच क्षेत्राचे जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी शाळेला भेट दिली. आंदोलनात शाळा समितीचे अध्यक्ष शोभेंद्र मेंढे, उपसरपंच दुर्वास दोनोडे, ग्रा.पं. सदस्य शालीक चामलाटे, चंद्रसेन बिसेन, लक्ष्मण राणे, नंदू मेंढे, टेकराम बहेकार, पालिकराम दोनोडे, योगराज तरोणे, प्रकाश दोनोडे, दिपा देवगिरे, इंद्रकला ब्राम्हणकर, पुष्पा दोनोडे, प्रेम कोरे तसेच गावकरी सहभागी झाले होते.