जिल्हा परिषद झाले निवडणूक आखाडा

By Admin | Updated: April 25, 2015 01:09 IST2015-04-25T01:09:41+5:302015-04-25T01:09:41+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेतील वातावरण सध्या निवडणुकीच्या ‘माहौल’ ने चांगलेच तापले आहे.

Zilla Parishad elections held | जिल्हा परिषद झाले निवडणूक आखाडा

जिल्हा परिषद झाले निवडणूक आखाडा

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेतील वातावरण सध्या निवडणुकीच्या ‘माहौल’ ने चांगलेच तापले आहे. समस्त कर्मचाऱ्यांना या निवडणुकीचा ज्वर चढला आहे. मात्र ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षांची नसली तरी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असल्याचा भास करणारी निश्चित आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी संस्थेच्या या निवडणुकीत तब्बल पाच पॅनल उतरले असल्यामुळे आणि त्यांचे प्रचारतंत्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे राबविले जात असल्यामुळे सध्या सर्वत्र सध्या याच निवडणुकीची चर्चा सुरू आहे.
एकूण २१ संचालकांसाठी (२० संचालक व एक सचिव) येत्या २६ एप्रिलला मतदान होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जवळपास २ हजार सभासदांपैकी मतदार यादीत नाव असलेले १६४४ सभासद मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आल्यानंतर या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये या संस्थेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष होते. मात्र २०१३ मध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मात्र २००९ पासून संजय बनकर हे सचिव पदावर कार्यरत आहेत.
येत्या रविवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ८ केंद्र प्रत्येक पंचायत समिती स्तरावर तर एक मतदान केंद्र मुख्यालयी जिल्हा परिषदेत राहणार आहे. दि.२७ ला या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे.
निवडणुकीच्या आखाड्यात पाच पॅनल उतरले आहेत. सत्तारूढ संचालकांच्या एकता पॅनलचे नेतृत्व आमगावचे सहायक प्रशासन अधिकारी तथा पतसंस्थेचे विद्यमाने सचिव संजय बनकर करीत आहेत. गेल्या पाच वर्षातील संस्थेच्या प्रगतीसोबतच भविष्यातील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या योजना घेऊन ते मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
या निवडणुकीतील दुसरे महत्वाचे पॅनल परिवर्तन पॅनलचे नेतृत्व सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी.जी.शहारे करीत आहेत. आपणच सभासदांच्या हितासाठी काम करणार असा दावा करीत आतापर्यंत काय झाले नाही, काय होणे अपेक्षित होते हे मांडून ते मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
या निवडणुकीतील समर्थ पॅनलचे नेतृत्व कर्मचारी महासंघाचे नेतृत्व करीत त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे सडक अर्जुनी पंचायत समितीचे कनिष्ठ लेखा अधिकारी शैलेश बैस करीत आहेत. कोणाच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता आपणच कसे हितचिंतक आहोत हे दाखविण्यासाठी ते प्रयत्नशील दिसतात.
यासोबतच आरोग्य सेविका निर्मलाबाई कापसे यांच्या नेतृत्वातील सहयोग पॅनल आणि तिरोड्याचे विस्तार अधिकारी काटगाये यांच्या नेतृत्वातील अभिनव पॅनलनेही आपापल्या परीने कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या पोस्टर, बॅनरसोबतच प्रत्येक कार्यालयात जाऊन प्रचारसभा घेऊन संपर्क करण्यामुळे ही निवडणूक विधानसभा निवडणुकीसाठी भासत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad elections held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.